Ayush Mhatre : 22 बॉलमध्ये 106 धावा, आयुष म्हात्रेची विस्फोटक खेळी, गोलंदाजांची धुलाई
Ayush Mhatre Century : मुंबईच्या 17 वर्षीय आयुष म्हात्रे नववर्षाची अप्रतिम आणि अफलातून अशी सुरुवात केली आहे. आयुषने सौराष्ट्रविरुद्ध विस्फोटक शतकी खेळी केली.
मुंबईचा युवा ऑलराउंडर आयुष म्हात्रे याने नववर्षाची धडाक्यात सुरुवात केली आहे. आयुष म्हात्रे याने विजय हजारे ट्रॉफीतील राउंड 7 मधील सामन्यात विजयी आव्हानांचा पाठलाग करताना विस्फोटक आणि झंझावाती शतकी खेळी केली. आयुषने सौराष्ट्रविरुद्ध एकूण 148 धावांची खेळी केली. आयुषने या खेळीसह मुंबईच्या विजयाचा पाया रचला. तसेच विजय सोपा करुन दिला. आयुषने सौराष्ट्र विरुद्ध अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात ही कामगिरी केली. आयुष म्हात्रेच्या या खेळीसाठी त्याचं क्रिकेट वर्तुळात अभिनंदन केलं जात आहे.
सौराष्ट्रने मुंबईला विजयासाठी 290 धावांचं आव्हान दिलं होतं. या विजयी आव्हानाचा पाठलाग करायला मुंबईकडून आयुष म्हात्रे आणि जय बिष्टा ही सलामी जोडी मैदानात आली. या सलामी जोडीने मुंबईला स्फोटक सुरुवात करुन दिली. आयुष आणि जयने जोरदार फटकेबाजी केली. आयुषने या दरम्यान 38 बॉलमध्ये 8 चौकार आणि 1 षटकारासह अर्धशतक पूर्ण केलं. या दोघांमध्ये 141 धावांची शतकी भागीदारी झाली. मात्र त्यानंतर 18 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर जय 45 धावांवर बाद झाला.
जय आऊट झाल्यानंतरही आयुषने दुसऱ्या बाजूने फटकेबाजी सुरुच ठेवली. आयुषने यासह या स्पर्धेतील त्याच्या तिसऱ्या सामन्यातील दुसरं शतक झळकावलं. आयुषने अर्धशतकानंतर अवघ्या 29 बॉलनंतर शतक पूर्ण केलं. आयुषने 67 बॉलमध्ये 10 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. आयुषने शतकानंतरही तडाखा सुरुच ठेवला. आयुष दीडशतकाच्या तोडांवर पोहचला आणि आऊट झाला. आयुषला आणखी मोठी खेळी करुन मुंबईला विजयी करुन नाबाद पोहचण्याची संधी होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. आयुष 148 धावांवर आऊट झाला.
आयुषने 93 बॉलमध्ये 159.14 च्या स्ट्राईक रेटने 9 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 148 धावा केल्या. आयुषने चौकार आणि षटकारांच्या मदतीने 22 चेंडूत 106 धावा केल्या. तर इतर रन्स धावून केल्या.
मुंबई प्लेइंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), आयुष म्हात्रे, सिद्धेश लाड, सूर्यकुमार यादव, प्रसाद पवार (विकेटकीपर), सूर्यांश शेडगे, अथर्व अंकोलेकर, शार्दुल ठाकुर, जय गोकुळ बिस्ता, हर्ष तन्ना आणि रॉयस्टन डायस.
सौराष्ट्र प्लेइंग इलेव्हन : जयदेव उनाडकट (कर्णधार), हार्विक देसाई (विकेटकीपर), जय गोहिल, अंकुर पनवार, चिराग जानी, विश्वराज जडेजा, अर्पित वसावडा, धर्मेंद्रसिंह जडेजा, पार्थ भुत, प्रणव कारिया आणि तरंग गोहेल.