टीम इंडियाची घोषणा होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याकडे शेवटची संधी, अन्यथा…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेला आता फक्त एका महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यात आयपीएल स्पर्धा सुरु असल्याने टीम इंडियाला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. विखुरलेल्या खेळाडूंना एकत्र आणून वर्ल्डकपसाठीची तयारी करावी लागणार आहे. तत्पूर्वी वर्ल्डकप संघात कोण असेल कोण नसेल याची चर्चा रंगली आहे.
आयपीएल 2024 स्पर्धा टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बीसीसीआय निवड समितीला खेळाडूंची निवड करण्यास यामुळे मदत होणार आहे. फॉर्मात असलेल्या खेळाडूंना संघात स्थान देऊन जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करता येईल. 15 खेळाडू असलेल्या संघात काही खेळाडूंचं स्थान निवड होण्यापूर्वीच पक्कं झालं आहे. तर काही खेळाडूंना संघात स्थान मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार आहे. या संघात रोहित शर्मा व्यतिरिक्त विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यांची नावं निश्चित आहेत. पण इतर खेळाडूंबाबत बरीच खलबतं सुरु आहेत. विकेटकीपर फलंदाज म्हणून ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना संधी मिळू शकते. तर गोलंदाजीच्या ताफ्यात मोहम्मद सिराज अनुभव पाहता निवडलं जाण्याची शक्यता आहे. पण अष्टपैलू म्हणून ख्याती असलेल्या हार्दिक पांड्याचं संघातील स्थान काही निश्चित होताना दिसत नाही. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत जखमी झाल्याने संघाबाहेर गेला होता. त्यानंतर आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळत हार्दिक पांड्याने कमबॅक केलं. मात्र हवी तशी छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे संघात निवड होणार की नाही याबाबत शंका आहे. असं असताना संघाची निवड होण्यापूर्वी हार्दिक पांड्याच्या हाती शेवटची संधी आहे. लखनौविरुद्ध चांगली कामगिरी केली तर विचार होऊ शकतो.
मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये एकूण 9 सामने खेळले आहेत. यात फलंदाजीत हवी तशी छाप सोडली नाही. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धची 46 धावांची खेळी सोडता. एकही सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. गुजरात टायटन्स विरुद्ध 11 रन्स, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 20 चेंडूत 24 धावा, राजस्थान विरुद्ध 21 चेंडूत 34, दिल्ली विरुद्ध 33 चेंडूत 39, आरसीबीविरुद्ध नाबाद 21, सीएसकेविरुद्ध 6 चेंडूत 2 धावा, पंजाबविरुद्ध 6 चेंडूत 10, राजस्थानविरुद्ध 10 चेंडूत 10 धावा, दिल्ली विरुद्ध 24 चेंडूत 46 धावा केल्या.
हार्दिकला गोलंदाजीतही मोठं काही करता आलं नाही. गुजरात विरुद्ध 3 षटकं टाकत 30 धावा दिल्या आणि गडी बाद करता आला नाही. हैदराबाद विरुद्ध 4 षटकात 46 धावा देत 1 गडी बाद केला. राजस्थान आणि दिल्लीविरुद्ध गोलंदाजी केली नाही. आरसीबीविरुद्ध 1 षटक टाकत 13 धावा दिल्या. चेन्नई विरुद्ध 3 षटकं टाकत 43 धावा देत 2 गडी टिपले. पंजाबविरुद्ध 4 षटकात 33 धावा देत एक गडी बाद केला. राजस्थान विरुद्ध 2 षटकात 21 धावा दिल्या. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 2 षटकात 41 धावा देत एकही गडी बाद करता आला नाही.