मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जखमेवर चोळलं मीठ! चाहत्यांनी ‘त्या’ पत्रानंतर व्यक्त केला संताप
रोहित शर्मा क्रिकेट कारकिर्दितील सर्वात वाईट काळातून जात आहे. आयसीसी स्पर्धांमधील पराभव किती महागात पडू शकतो याचं उत्तम उदाहरण आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवानंतर आता क्रिकेट कारकिर्दिला नजर लागली आहे. मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद गेलं आहे. त्यानंतर फ्रेंचायसीने एक पत्र जाहीर केलं आहे. ते वाचून क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी रोहित शर्माला मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून त्याला दूर केलं आहे. गेली 11 वर्षे मुंबई इंडियन्स त्याच्या नेतृत्वात खेळली होती. मुंबईला पाच जेतेपद मिळवून देण्यात त्याचा मोठा हातभार होता. मात्र आता त्याला दूर सारून मुंबई इंडियन्स फ्रेंचायसीने हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिलं आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. इतकं सर्व झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने पत्र जाहीर करत रोहित शर्मावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. त्याच्या 11 वर्षांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडला आहे. यात रोहित शर्माने पाच जेतेपद मिळवून देण्यात किती मोलाचा वाटा होता याबाबत लिहिलं आहे. हे सर्व वाचल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माच्या चाहत्यांची तळपायची आग मस्तकात गेली आहे. त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केलेल्या पत्राखाली आपला राग व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
एका युजर्सने लिहिलं आहे की, रोहित शर्माला जर आत्मसन्मान असेल तर त्याने फ्रेंचायसी सोडून द्यावी. मुंबई इंडियन्स सर्वीकडे अनफॉलो करावा. त्यांनी रोहित शर्माचा कोणताही सन्मान केलेला नाही. गरज सरो आणि वैद्य मरो अशीच स्थिती आहे. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलं आहे की, इतकी सर्व स्तुती करता मग त्याला पदावरून दूर कसं केलं. हा काही त्याचा सन्मान नाही. शेवटची आयपीएल खेळवून त्याला सन्मानाने दूर करायला हवं होतं. तिसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, आम्ही रोहित शर्माचं कर्णधारपद मिस करू.
रोहित शर्मा 2013 पासून मुंबई इंडियन्स कर्णधारपद भूषवत होता. मागच्या दहा वर्षात सर्वात यशस्वी कर्णधारापैकी एक आहे. आयपीएलमध्ये 158 सामन्यात त्याने मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद भूषवलं. त्यापैकी 87 सामन्यात विजय मिळवला. तर 67 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. मुंबई इंडियन्सने 2103, 2015, 2017, 2109, 2020 साली जेतेपद जिंकलं आहे. रिकी पॉटिंगच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स स्ट्रगल करत असताना रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आलं होतं.
1⃣0⃣ Years, 6⃣ Trophies1⃣ Mumbai Cha ℝ𝕒𝕛𝕒!
𝐑𝐎𝐇𝐈𝐓 𝐒𝐇𝐀𝐑𝐌𝐀! 💙
Read more ➡️https://t.co/t3HIaC8C9f pic.twitter.com/Kt7FoBLJCI
— Mumbai Indians (@mipaltan) December 15, 2023
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पराभवानंतर आता त्याला उतरती कळा लागली आहे. आता रोहित शर्माच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. रोहित आता काय भूमिका घेतो? यावर सर्वकाही अवलंबून आहे. 36 वर्षीय रोहित शर्मा याच्या आयपीएल कारकिर्दीचा शेवट असू शकतो.