अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला पुन्हा उपरती, रोहित शर्माला दिल्या भावी वाटचालीच्या शुभेच्छा
रोहित शर्मा 14 महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा टी20 संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. एकिकडे मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद गेलं असलं तरी बीसीसीआयने त्याच्यावर टीम इंडियाची धुरा सोपवली आहे. रोहित शर्माच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्स फ्रेंचायसी त्याच्यावर वारंवार शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. पहिल्या सामन्यापूर्वीही असंच काहीसं केलं.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभव सोडला तर रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली. एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली होती. पण दुर्दैवाने अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आणि रोहित शर्माच्या वाटेला नैराश्य आलं. इतकंच काय तर 2023 वर्ष सरता सरता मुंबई इंडियन्सचं कर्णधारपदही गमवावं लागलं. पण नववर्षात रोहित शर्माने सर्व दु:ख बाजूला सारून जोरदार उसळी घेतली आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवली. तसेच 13 वर्षानंतर दक्षिण अफ्रिकेत मालिका बरोबरीत सोडवण्याच विक्रम नोंदवला. सर्व काही ट्रॅकवर येत असताना रोहित शर्माला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली. ते म्हणजे 14 महिन्यानंतर रोहित शर्माने टी20 संघात पुनरागमन केलं. इतकंच काय तर त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुराही सोपण्यात आली आहे. त्यामुळे चार महिन्यांनी होणाऱ्या टी20 वर्ल्डकपसाठीचं नेतृत्वही त्याच्याकडेच असेल हे आता जवळपास निश्चित झालं आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स आपल्या माजी कर्णधाराला ट्विटरवरून वारंवार शुभेच्छा देत आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वीही मुंबई इंडियन्सने ट्वीट केलं आहे.
मुंबई इंडियन्सनने ट्वीट करत लिहिलं आहे की, रोहित रिटर्न आला आहे. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेपूर्वीचं अंतिम मिशन आहे. तसेच मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू एक्शनमध्ये आला आहे. तसेच हॅशटॅग वन फॅमिली करत एक पत्र पोस्ट केलं आहे. “हिटमॅन 400 दिवसांनंतर टी20I क्रिकेटमध्ये परतला. तुम्ही यावर विश्वास ठेवू शकता का? भारतासाठी 20 षटकांच्या खेळात प्रतिष्ठित ‘पुल शॉट’शिवाय 400 दिवसांहून अधिक दिवस आम्ही गमावले.”
𝐑𝐎 returns 🥳Final mission before T20 World Cup 2024 💙3️⃣ MI stars in action 🤩
𝐓𝐡𝐢𝐬 𝐬𝐞𝐫𝐢𝐞𝐬 𝐡𝐚𝐬 𝐢𝐭 𝐚𝐥𝐥! Read here about #INDvAFG! 🗞️👇#OneFamilyhttps://t.co/jIefCWJjno
— Mumbai Indians (@mipaltan) January 11, 2024
रोहित शर्मा अफगाणिस्तान विरुद्धच्या टी20 मालिकेत काही विक्रमांची नोंद करू शकतो. विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीचा विक्रमही त्याच्या रडारवर आहे. तसेच टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीची ही रंगीततालिम असल्याचं देखील बोललं जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात ही मालिका 3-0 ने जिंकली तर त्याच्या टी20 वर्ल्डकपमधील कर्णधारपदावर जवळपास शिक्कामोर्तब लागेल. दुसरीकडे, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव दुखापतीने त्रस्त असून कमबॅकसाठी अजून काही काळ लागेल.
अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे , रवी बिष्णोई