MI vs SRH : सूर्याचं नाबाद शतक, मुंबईचा 7 विकेट्सने विजय, हैदराबादचा बदला घेतलाच
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Highlights In Marathi : सूर्यकुमार यादव याच्या शतकी झंझावाताच्या जोरावर मुंबई इंडियन्सने हैदराबादला 7 विकेट्सने पराभूत करत वचपा घेतला.
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 55 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादचा हिशोब क्लिअर केला आहे. मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादचा 7 विकेट्सने धुव्वा उडवत चौथा विजय मिळवला आहे. मुंबईने विजयासाठी मिळालेलं 174 धावांचं आव्हान हे 17.2 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. लोकल बॉय सूर्यकुमार यादव मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सूर्याने वानखेडे स्टेडियममध्ये विजयी सिक्स ठोकत शतक पूर्ण केलं. सूर्याचं हे आयपीएलच्या इतिहासातील दुसरं शतक ठरलं. तसेच तिलक वर्मा याने सूर्यकुमारला अफलातून साथ दिली.
सूर्यकुमार यादवने शतकासाठी आणि मुंबईच्या विजयासाठी 6 धावांची गरज असताना सिक्स ठोकला. सूर्याने या सिक्ससह शतकही पूर्ण केलं आणि मुंबईला विजयही मिळवून दिला. सूर्याने 51 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 12 चौकारांसह 200 च्या स्ट्राईक रेटने 102 धावांची नाबाद खेळी केली. तर तिलक वर्माने 32 बॉलमध्ये नॉट आऊट 37 रन्स केल्या. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 143 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली.
सूर्या आणि तिलक व्यतिरिक्त मुंबईकडून तिघांपैकी दोघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर एकाला भोपळाही फोडता आला नाही. ईशान किशन याने 9 तर रोहित शर्माने 4 धावा केल्या. तर नमन धीर आला तसाच झिरोवर आऊट होऊन गेला. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, मार्को जान्सेन आणि कॅप्टन पॅट कमिन्स या तिघांनी 1-1 विकेट घेतली. मुंबईने या विजयासह हैदराबादचा वचपा घेतला. हैदराबादने मुंबईला 27 मार्च रोजी 31 धावांनी पराभूत केलं होतं.
सूर्याने मारलेला विजयी षटकार
📸 That picture perfect moment for Mumbai Indians 💙
Suryakumar Yadav leads #MI to victory with another special innings from him 👌
Scorecard ▶️ https://t.co/iZHeIP3ZRx#TATAIPL | #MIvSRH pic.twitter.com/HJeeO0lmr3
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2024
हैदराबादची बॅटिंग
दरम्यान त्याआधी मुंबईने टॉस जिंकून कॅप्टन हार्दिक पंड्या याने हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 173 धावा केल्या. हैदराबादसाठी ओपनर ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. तर अखेरीस कॅप्टन पॅट कमिन्स याने 17 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह नाबाद 35 धावांची खेळी केली. तर मुंबईकडून हार्दिक पंड्या आणि पीयूष चावला या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जान्सेन, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.