Under 19 World Cup 2024 साठी न्यूझीलंड टीमची घोषणा, मराठमोळ्या खेळाडूची निवड
Icc Under 19 World Cup 2024 New Zealand Squad | न्यूझीलंड क्रिकेटने आगामी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 1 महिन्याआधीच टीमची घोषणा केली आहे. टीम मॅनेजमेंटने मुख्य संघात 15 आणि 6 खेळाडूंना राखीव म्हणून स्थान दिलं आहे.
वेलिंग्टन | आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं आयोजन हे दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं आहे. ही स्पर्धेचं आयोजन 19 जानेवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेत टीम इंडियासह एकूण 16 संघ सहभागी होणार आहे. अंडर 19 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंड क्रिकेट टीमची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसीने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. या स्पर्धेत ऑस्कर जॅक्सन हा न्यूझीलंडंच कर्णधारपद सांभाळणार आहे.
न्यूझीलंडने टीमने वर्ल्ड कपसाठी मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तसेच राखीव खेळाडू म्हणून 6 जणांना संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या या वर्ल्ड कप टीममध्ये मराठमोळ्या अमोघ परांजपे याची निवड करण्यात आली आहे. अमोघला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आलं आहे. तसेच टीममध्ये माजी कर्णधाराच्या नातवाची निवड करण्यात आली आहे.
जॅक कमिंग हा माजी सलामीवीर क्रेग कमिंगचा मुलगा आहे. तसेच मॅट रो हा हॅना रोवेचा चुलत भाऊ आहे. तर टॉम जोन्स हा माजी कसोटी कर्णधार जेरेमी कोनी यांचा नातू आहे. कोनी यांनी न्यूझीलंडचं एकूण 140 आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे या तिन्ही युवा खेळाडूंचा क्रिकेटचा वारसा यशस्वीरित्या पुढे नेण्याचा प्रयत्न असेल.
दरम्यान या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया, बांगलादेश, आयर्लंड, यूएसए, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, स्कॉटलँड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिंबाब्वे, नामिबिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि नेपाळ हे एकूण 16 संघ एका ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. न्यूझीलंड टीम डी ग्रुपमध्ये आहे.
न्यूझीलंडच्या सामन्यांचं वेळापत्रक
या स्पर्धेत 16 संघांना 4 ग्रुपमध्ये 4-4 नुसार विभागण्यात आलं आहे. त्यानुसार डी ग्रुपमध्ये न्यूझीलंडसोबत अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि नेपाळचा समावेश आहे. प्रत्येक टीम आपल्या ग्रुपमधील 3 टीमसह प्रत्येकी 1 मॅच खेळेल. न्यूझीलंडचा पहिला सामना हा 21 जानेवारी रोजी पार पडेल. न्यूझीलंडसमोर पहिल्या सामन्यात नेपाळचं आव्हान असेल. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान असा सामना 23 जानेवारी होईल. तर तिसरा आणि अखेरचा सामना पाकिस्तान विरुद्ध 27 जानेवारीला पार पडेल.
अंडर 19 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंड क्रिकेट टीम | ऑस्कर जॅक्सन (कॅप्टन), मेसन क्लार्क, सॅम क्लोड (विकेटकीपर), जॅक कमिंग, रहमान हेकमत, टॉम जोन्स, जेम्स नेल्सन, स्नेहित रेड्डी, मॅट रोव, एवाल्ड श्रुडर, लाचलान स्टॅकपोल, ओलिवर तेवतिया, एलेक्स थॉम्पसन, रेयान सोर्गस आणि ल्यूक वॉटसन.
राखीव खेळाडू | बेन ब्रेइटमेयर, निक ब्राउन, हेनरी क्रिस्टी, रॉबी फॉल्क्स, जोश ओलिवर आणि अमोघ परांजपे.