नई दिल्ली : पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसाठी शुक्रवारचा दिवस कुठल्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता. लखनौ सुपर जायंट्सच्या टीमने पंजाब किंग्स विरुद्ध आयपीएल 2023 मधील सर्वाधिक 257 धावा फटकावल्या. आयपीएल इतिहासातील ही दुसरी मोठी धावसंख्या आहे. आपल्या घरच्या मैदानावर पंजाबचा लखनौने 56 धावांनी पराभव केला. कगिसो रबाडा पंजाब किंग्ससाठी यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 2 विकेट काढल्या. पण त्यासाठी त्याने 4 ओव्हरमध्ये 52 धावा खर्च केल्या.
रबाडाने काय चूक केली?
एकाबाजूला लखनौ सुपर जायंट्सचे फलंदाज पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई करत होते. दुसऱ्याबाजूला पंजाबचे बॉलर अतिरिक्त धावा देण्यामध्ये सुद्धा मागे नव्हते. कगिसो रबाडा सारख्या अनुभवी गोलंदाजाने दोन नो बॉल टाकले. त्यावर न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि मॅचमध्ये कॉमेंट्री करणारा सायमन डुल भडकला. रबाडाने दुसऱ्यांदा ओव्हरस्टेप टाकल्यानंतर डुल चिडला. 16 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर रबाडाने लखनौला फ्री हिट दिला. त्यानंतर पुढचा बॉल वाइड टाकला.
विराट कोहलीला सुद्धा झापलेलं
रबाडाच्या नो बॉलवर कॉमेंट्री करणारा सायमन डुल म्हणाला की, “हे मान्य नाही. तुम्ही एका आंतरराष्ट्रीय गोलंदाज आहात. सतत पुढे चाललाय. जे योग्य चेंडू आहेत, त्यातही पाय एक इंच मागे आहे” सायमन डुल बिनधास्तपणे आपलं मत मांडण्य़ासाठी ओळखले जातात. मंदगतीने फलंदाजी केल्याबद्दल पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आणि विराट कोहलीवर सुद्धा त्यांनी टीका केलीय.
मॅचमध्ये एकूण 458 धावा
लखनौ सुपर जायंट्सच्या काइन मेयर्सने 24 चेंडूत 54 धावा केल्या. त्याने लखनौला तुफानी सुरुवात दिली. त्यानंतर आयुष बदोनीने 24 चेंडूत 43, स्टॉयनिसने 40 चेंडूत 72 आणि निकोलस पूरनने 19 चेंडूत 45 धावा चोपल्या. त्यामुळे लखनौने 257 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबचा डाव 201 धावात आटोपला. पंजाबकडून अर्थव तायडेने सर्वाधिक 36 चेंडूत 66 धावा केल्या. त्याच्याशिवाय कुठलाही फलंदाज पीचवर फारकाळ टिकला नाही. या मॅचमध्ये दोन्ही टीम्सनी मिळून एकूण 458 धावा केल्या. पंजाबने हा सामना 56 धावांनी गमावला.