चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी धक्का! वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या खेळाडूची अचानक निवृत्ती, म्हणाला…
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आता अवघ्या दिवसांवर येऊन ठेपली आहे. असं असताना संघ निवडीपूर्वीच दिग्गज खेळाडूने क्रीडाप्रेमींना धक्का दिला आहे. वर्ल्डकप स्पर्धेत त्याने ठोकलेलं द्विशतक कायम स्मरणात राहिल. निवृत्तीनंतर त्याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेची जोरदार तयारी सुरु आहे. या स्पर्धेसाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. तर इतर संघांना खेळाडू जाहीर करण्यासाठी 12 जानेवारीची डेडलाईन आहे. भारतीय संघही 12 जानेवारीला जाहीर केला जाणार आहे. असं असताना न्यूझीलंडला टीम जाहीर करण्यापूर्वीच धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेट मार्टिन गप्टिल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 2009 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. आता त्याच्या क्रिकेट कारकिर्दिचा 15 वर्षांचा काळ संपला आहे. पण मार्टिन गप्टिल मागच्या दोन वर्षांपासून न्यूझीलंड संघात नव्हता. मार्टिन गप्टिलने न्यूझीलंडसाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दित त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. 2015 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत त्याने द्विशतक ठोकलं होतं. तसेच न्यूझीलंडसाठी वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मार्टिन गप्टिलने निवृत्ती घेताना सांगितलं की, ‘एक तरूण म्हणून मला न्यूझीलंडसाठी खेळण्याचं स्वप्न होतं. मी माझ्यासाठी 367 सामने खेळलो. याचा मला अभिमान आहे. मी या आठवणी कायम स्मरणात ठेवीन. दिग्गज क्रिकेटपटूंसोबत खेळत या आठवणी मिळवल्या आहेत. मी संघातील सर्व सहकारी आणि कोचिंग स्टाफचे आभार मानतो. विशेष करून मार्क ओडॉनेल यांचे आभार.. कारण अंडर 19 पातळीवर त्यांनी मला कोचिंग दिलं. तसेच पुढच्या कारकिर्दितही त्यांचं मार्गदर्शन लाभलं. माझे मॅनेजर लीन मॅकगोल्ड्रिक यांचेही आभार.. पडद्यामागच्या कामात त्यांनी मला कायम मदत केली. त्यांचं सहकार्य विसरून चालणार नाही. मी त्यांचाही आभारी आहे.’
मार्टिन गप्टिलने टी20 लीग सामने खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आता पूर्णविराम लागला आहे. मार्टिन न्यूझीलंडसाठी 198 वनडे, 122 टी20 आमि 47 कसोटी सामने खेळला आहे. कसोटीत त्याने 3 शतकं आणि 17 अर्धशतकांच्या मदतीने 2586 धावा केल्या. तर वनडेत 41.73 च्या सरासरीने 7346 धावा केल्या. टी20 क्रिकेटमध्ये त्याने 31.81 च्या सरासरीने 3531 धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने टी20 दोन शतकं ठोकली आहेत.