NZ vs PAK | न्यूझीलंडकडून पाकड्यांची जोरदार धुलाई, पाकिस्तानसमोर 402 धावांचं मजबूत आव्हान
New Zealand vs Pakistan | रचिन रविंद्र याने पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसं काढली. रचिनने पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये 3 शतक ठोकत मोठा विक्रमही केला. त्याने नक्की काय केलं जाणून घ्या.
बंगळुरु | न्यूझीलंड क्रिकेट टीमने पाकिस्तानसमोर विजयासाठी 402 धावांचं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 401 धावा केल्या. युवा रचिन रविंद्र याचं शतक आणि नियमित कर्णधार केन विलियमसन याने केलेल्या 95 धावांच्या जोरावर न्यूझीलंडला 400 पार मजल मारता आली. केन विलियमसन याने दुखापतीनंतर शानदार खेळी केली. मात्र तो दुर्देवाने नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. केनचं शतक 5 धावांनी हुकलं. तसेच न्यूझीलंडच्या इतर फलंदाजांनाही चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना मोठी खेळीत त्याचं रुपांतर करण्यात यश आलं नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम जुनिअर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडची बॅटिंग
पाकिस्तानने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. रचिन आणि डेव्हॉन कॉनव्हे या सलाम जोडीने 68 धावांची भागीदारी केली. कॉनव्हे 35 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर रचिन आणि कॅप्टन केन या दोघांनी शानदार भागीदारी केली. या दरम्यान रचिनने वर्ल्ड कप 2023 मधील तिसरं शतक ठोकत सचिनचा रेकॉर्ड ब्रेक केला. दुसऱ्या विकेटसाठी 180 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर केन आऊट झाला. केनने 79 बॉलमध्ये 10 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 95 धावांची खेळी केली.
केननंतर काही वेळेनी रचिनही आऊट झाला. रचिनने 94 बॉलमध्ये 15 चौकार 1 सिक्ससह 108 धावा केल्या. रचिनने वर्ल्ड कपमध्ये 24 वर्षांच्या आधीच सर्वाधिक 3 शतकांचा सचिनचा रेकॉर्ड मोडला. केन-रचिन सेट जोडी बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या उर्वरित फलंदाजांनी चांगलं योगदान दिलं. मात्र त्यापैकी एकालाही मोठी खेळी करता आलं नाही.
मार्क चॅपमॅन 39, ग्लेन फिलिप्स 41, मिचेल सँटनर 26 आणि डॅरेल मिचेल याने 29 धावांच योगदान दिलं. तर मिचेल सँटनर याने नाबाद 26 धावा केल्या. तर टॉम लॅथम 2 रन्सवर नॉट आऊट परतला. पाकिस्तानकडून ज्यूनियर व्यतिरिक्त हसन अली, इफ्तिखार अहमद आणि हरीस रौफ या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
पाकड्यांना झोडलं
दरम्यान वनडे क्रिकेटमधील नंबर 1 बॉलर शाहीन अफ्रिदी याला विकेट घेण्यात अपयश तर आलंच. सोबतच शाहीनने सर्वाधिक 90 धावा दिल्या. तसेच हसन अली याने 82 आणि हरीस रौफ याने 85 धाला लटवल्या.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, ईश सोढी, टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्ट.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर आणि हरिस रौफ.