मुंबई: इंग्लंडला त्यांच्याच देशात पराभवाचं पाणी पाजून टीम इंडिया पोर्ट ऑफ स्पेन मध्ये दाखल झाली आहे. शुक्रवारपासून भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये (India vs West Indies) तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला (Odi series) सुरुवात होत आहे. या वनडे सीरीज मध्ये भारताचे अनेक दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार नाहीत. मात्र तरीही टीम इंडिया मजबूत आहे. पण वेस्ट इंडिजचा कॅप्टन निकोलस पूरनला (Nicholas Pooran) असं वाटत नाही. निकोलस पूरन टीम इंडियाला कमी लेखण्याची चूक करतोय. पूरनने भारताच्या वनडे स्क्वाडबद्दल जे मत व्यक्त केलं, ते वाचल्यानंतर कदाचित तुम्हाला हसू येईल.
टीम इंडियातील अनेक मोठे खेळाडू वनडे सीरीज मध्ये खेळत नाहीयत. त्यामुळे भारतीय संघाला हरवणं अजून सोपं होईल, असं निकोलस पूरनच मत आहे. त्रिनिदाद मध्ये होणाऱ्या वनडे मॅच आधी निकोलस पूरन दबावाचा खेळ खेळतोय. “अनेक भारतीय खेळाडू वनडे सीरीज मध्ये नाहीयत. त्यामुळे आमचं काम अजून सोपं होईल” असं पूरन म्हणाला. असं जरी पूरनने म्हटलं असलं, तरी टीम इंडियाची क्षमता देखील मान्य केली. “भारताकडे लाखो खेळाडू आहेत, जे संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात” असं पूरन म्हणाला.
“टीम इंडियाकडे चेंडू आणि बॅटने मॅच जिंकवून देणारे अनेक खेळाडू आहेत. वेस्ट इंडिजचा संघ त्यांना कडवी टक्कर देईल. वेस्ट इंडिजचा संघ वर्ल्ड क्रिकेटला संदेश देणार आहे” असं पूरनने सांगितलं.
टीम इंडियाचे सीनियर खेळाडू वनडे सीरीज मध्ये खेळत नाहीयत. यात विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि रोहित शर्माचा समावेश आहे. पंत आणि रोहित शर्मा पाच सामन्यांच्या टी 20 सीरीज मध्ये खेळताना दिसतील. विराट-बुमराह यांना संपूर्ण सीरीजसाठी विश्रांती दिलीय. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवन वनडे संघाचा कर्णधार आहे. सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा आणि इशान किशन सारखे युवा खेळाडू आपली प्रतिभा दाखवताना दिसतील. गोलंदाजीत युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंह सारखे टॅलेंटेड खेळाडू उपलब्ध आहेत. दुसऱ्याबाजूला वेस्ट इंडिजने मायदेशातच बांगलादेशविरुद्ध वनडे सीरीज गमावली आहे. बांगलादेशने वेस्ट इंडिजला 3-0 अशी धुळ चारली.