धक्कादायक! डोपिंग टेस्टमध्ये कर्णधार झाला फेल, क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये घातली बंदी
क्रीडा जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डोपिंग विरोधी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एका स्टार क्रिकेटपटूवर बंदी घालण्यात आली आहे. नेमका हा खेळाडू कोण ते जाणून घ्या.
क्रिकेट विश्वातून आलेल्या बातमीने क्रीडारसिकांना धक्का बसला आहे. कारण डोप टेस्टमध्ये फेल झाल्याने श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवर बंदी घालण्यात आली आहे. श्रीलंकेच्या या क्रिकेटपटूचं नाव आहे निरोशन डिकवेला..लंका प्रीमियर लीग दरम्यान डोपिंग विरोधी नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळून आलं. त्याची डोपिंग टेस्ट फेल झाली आणि डिकवेलावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी किती काळ असेल हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. श्रीलंका क्रिकेटच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे Newswire.LK ने वृत्त दिले आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास सुरू असताना यष्टिरक्षक-फलंदाजवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली जाऊ शकते. त्याच्या शिक्षेच्या मर्यादेबाबत लवकरच औपचारिक घोषणा अपेक्षित आहे. लंका प्रीमियर लीगमध्ये डिकवेला हा गॅले मार्व्हल्सचा कर्णधार होता. त्याने स्पर्धेच्या 10 डावात 153.33 च्या स्ट्राईक रेटने 184 धावा केल्या होत्या. संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला होता. पण जाफना किंग्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. डिकवेलाने 8 चेंडूत फक्त 5 धावा केल्या होत्या.
निरोशन डिकवेला आणि वाद यांचं जुनं नातं आहे. यापूर्वीही अनेक वादात अडकला होता. 2021 मध्ये इंग्लंडमध्ये बायो बबलचं उल्लंघन केल्याप्रकरणी दानुष्खा गुनाथिलका आणि कुसल मेंडिससह एका वर्षाची बंदी घातली होती. त्यानंतर दीर्घ कालावाधीसाठी संघाबाहेर राहिला. त्याने शेवटचा कसोटी सामना 2023 च्या सुरुवातीला खेळला होता. तर शेवटचा व्हाइट बॉल आंतरराष्ट्रीय सामना 2022 मध्ये खेळला होता.
निरोशन डिकवेलाने श्रीलंकेसाठी आतापर्यंत 54 कसोटी, 55 वनडे आणि 28 टी20 सामने खेळला आहे. कसोटीत 30.97 च्या सरासरीने 2757 धावा केल्या आहेत. यात 22 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेत 31.45 च्या सरासरीने 1604 धावा केल्या आहेत. तर टी20 क्रिकेटमध्ये 480 धावा केल्या आहेत.