NZ vs BAN : न्यूझीलंडने बांगलादेशचा हिशेब केला चुकता, एका झटक्यात उतरवली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची नशा
न्यूझीलंडने दुसरा कसोटी सामना जिंकत मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत टॉपला जाण्याचं बांगलादेशचं स्वप्न भंगलं आहे. पहिल्या कसोटीत विजय मिळवून दुसऱ्या स्थानी झेप घेतली होती. पण आता सर्वच चित्र बदललं आहे.
मुंबई : न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने विजय मिळवत आघाडी घेतली होती. पण न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवताच मालिका बरोबरीत सुटली आहे. बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद 172 धावा केल्या. त्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने सर्वबाद 180 धावा करत 8 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात बांगलादेशने आश्वासक सुरुवात केली होती. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी बांगलादेशच्या संघाला बरोबर घेरलं. बांगलादेशला दुसऱ्या डावात अवघ्या 144 धावांवर रोखलं आणि विजयसाठी 137 धावांचं आव्हान मिळालं. न्यूझीलंडने हे आव्हान 6 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
बांगलादेशचा दुसरा डाव
बांगलादेशने दुसऱ्या डावाचा खेळ सुरु केला तेव्हा न्यूझीलंडकडे 8 धावांची आघाडी होती. तसेच दुसऱ्या दिवसा धचा खेळ पावसाने वाया गेल्याने खेळपट्टी गोलंदाजांसाठी पूरक झाली होती. त्यामुळे दुसऱ्या डावात बांगलादेशकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. बांगलादेशकडून आघाडी उतरलेला झाकिर हसन सोडला तर एकही फलंदाज तग धरू शकला नाही. झाकिरने 86 चेंडूत 59 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त नजमुल होसेन शांतो, मोमिनुल हक आणि तैजुल हसन या फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. तसेच बाकी सर्व फलंदाज एकेरी धावसंख्येवर तंबूत परतले. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने सर्वाधिक 6 गडी बाद केले. तर मिचेल सँटनरने 3 आणि टिम साउदीने 1 गडी बाद केला.
न्यूझीलंडचा दुसरा डाव
बांगलादेशने दिलेल्या 137 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवातही अडखळतच झाली. संघाच्या 5 धावा असताना पहिली विकेट गेली. त्यानंतर 24 धावांवर दुसरी, 33 वर तिसरी विकेट, 48 धावांवर चौथी, 51 धावांवर पाचवी आणि 69 धावांवर सहावी विकेट गेली. यानंतर ग्लेन फिलिप्स आणि मिचेल सँटनर यांनी डाव सावरला. दोघांनी जबरदस्त खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. ग्लेन फिलिप्सने नाबाद 40 आणि मिचेल सँटनरेने नाबाद 35 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून शोरीफुल इस्लामने 1, मेहिदी मिराजने 3 आणि तैजुल इस्लामने 2 गडी बाद केले.
दोन्ही संघाचे खेळाडू
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शहादत हुसेन, मेहदी हसन मिराझ, नुरुल हसन (विकेटकीपर), नईम हसन, तैजुल इस्लाम, शरीफुल इस्लाम
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम, डेव्हन कॉनवे, केन विल्यमसन, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, काइल जेमिसन, टिम साऊदी (कर्णधार), एजाज पटेल