NZ vs ENG : पहिल्या कसोटीचा पहिला दिवस संपला, टॉस इंग्लंडच्या बाजूने पण न्यूझीलंड मजबूत स्थितीत
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावावर राहिला. पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडने 8 गडी गमवून 319 धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने इंग्लंडविरुद्धची मालिका खूपच महत्त्वाची आहे. विजयी टक्केवारी वाढवून पहिलं स्थान काबीज करण्याची संधी न्यूझीलंडकडे आहे.न्यूझीलंडने तीन सामन्यांची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली तर अंतिम फेरीतील स्थान पक्कं होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने सांगितलं की, ही खेळपट्टी चांगली दिसत आहे. नव्या चेंडूने विकेट घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण बेन स्टोक्सच्या या अंदाजावर केन विल्यमसनने पाणी फेरलं. 250 च्या आता बाद करण्याचा मनसुबा उधळून लावला. केन विल्यमसमने 93 धावांची खेळी केली आणि इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. न्यूझीलंडने पहिल्या दिवसअखेर 8 गडी गमवून 319 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवशी यात आणखी काही धावांची भर पडणार यात शंका नाही. त्यामुळे पहिल्या डावातील हे आव्हान इंग्लंडला भारी पडेल असं दिसत आहे. दुसरीकडे, भारताला 3-0 ने पराभूत केल्याने न्यूझीलंडचा आत्मविश्वास दुणावलेला आहे.
न्यूझीलंडकडून टॉम लॅथम आणि डेवॉन कॉनवे ही जोडी ओपनिंगला आली. पण संघाच्या 4 धावा असताना डेवॉन कॉनवेच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्याला फक्त 2 धावाच करता आल्या. त्यानंतर केन विल्यमसन आणि टॉम लॅथमची जोडी जमली. दोघांनी 58 धावांची भागीदारी केली. मात्र 47 धावांवर असताना टॉम लॅथम बाद झाला. केन विल्यमसन आणि रचिन रविंद्र यांनी भागीदारी पुढे नेली. या जोडीने 68 धावा केल्या आणि रचिन 34 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला डेरिल मिचेल 19 धावा करून तंबूत परतला. तर केन विल्यमसनचं शतक 7 धावांनी हुकलं. नाथन स्मिथ 3, मॅट हेन्ररी 18 धावा करून तंबूत परतले. पहिल्या दिवसअखेर ग्लेन फिलिप्स नाबाद 41 आणि टिम साउदी नाबाद 10 धावांवर खेळत आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, टिम साउथी, मॅट हेन्री, विल्यम ओरर्के.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, ऑली पोप (विकेटकीपर), बेन स्टोक्स (कर्णधार), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, शोएब बशीर.