NZ vs PAK : तिसऱ्या टी20 सामन्यात पाकिस्तान 9 गडी राखून विजयी, मालिकेत 2-1 अशी स्थिती
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या तिसरा सामना जिंकून पाकिस्तानने मालिकेत जीव ठेवला आहे. पहिल्या दोन सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला होता. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात करो या मरोची लढाई होती. पाकिस्तानने हा सामना 9 गडी राखून जिंकला.

पाकिस्तानने तिसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 19.5 षटकात सर्व गडी गमवून 204 धावा केल्या आणि विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पाकिस्तानने 1 गडी गमवून 16व्या षटकात पूर्ण केलं. या विजयासह पाच सामन्याच्या टी20 मालिकेत पाकिस्तानने 2-1 अशी स्थिती आणली आहे. मालिका विजयासाठी न्यूझीलंडला एका विजयाची, तर पाकिस्तानला उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. न्यूझीलंडकडून मार्क चॅपमनने सर्वाधिक 94 धावांची खेळी केली. त्याने 44 चेंडूत 94 धावा केल्या. यात 11 चौकार आणि 4 षटकार मारले. पाकिस्तान हा सामना जिंकेल की नाही अशी शंका होती. पण आघाडीच्या तीन फलंदाजांनी विजय मिळवून दिला.
मोहम्मद हरिस आणि हसन नवाज या जोडीने पहिल्या विकेटसाठी 74 धावांची खेळी केली. हरिस 20 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार मारून 41 धावांवर बाद झाला. त्यानंतर हसन नवाज आणि सलमान आघा यांनी विजयी भागीदारी केली. हसन नवाजने 45 चेंडूत 10 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 105 धावा केल्या. तर सलमान आघाने 31 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावांची खेळी केली. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील चौथा सामना 23 मार्चला होणार आहे. या सामन्यातील विजय अंतिम सामन्यांचं महत्त्व ठरवणार आहे. हा सामना पाकिस्तानने जिंकला तर अंतिम फेरीत दोन्ही संघांसाठी मालिका विजयासाठी धडपड करतील. पण चौथा सामना न्यूझीलंडने जिंकला तर मालिका खिशात घाले.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद हरिस (विकेटकीपर), हसन नवाज, सलमान आघा (कर्णधार), इरफान खान, खुशदिल शाह, शादाब खान, अब्दुल समद, शाहीन आफ्रिदी, अब्बास आफ्रिदी, अबरार अहमद, हरिस रौफ.
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टिम सेफर्ट, फिन अॅलन, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), काइल जेमिसन, जेकब डफी, ईश सोधी, बेन सियर्स.