NZ vs SA : क्विंटन डी कॉक याचं वर्ल्ड कपमधील चौथं शतक, मोठ्या विक्रमाची बरोबरी
Quinton De Kock Century | क्विंटन डी कॉक वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये सुरुवातीपासून ते आतापर्यंत सातत्याने धमाकेदार कामगिरी करतोय. क्विंटनने न्यूझीलंड विरुद्धही आपली छाप सोडलीय.
पुणे | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. न्यूझीलंडने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. दक्षिण आफ्रिका टीमचा विकेटकीपर बॅट्समन क्विंटन डी कॉक आपला अखेरचा वनडे वर्ल्ड कप खेळत आहे. क्विंटन डी कॉक याने आपला धमाका न्यूझीलंड विरुद्धही कायम ठेवला आहे. क्विंटन डी कॉक याने न्यूझीलंड विरुद्ध खणखणीत शतक ठोकलंय. क्विंटनने सिक्स ठोकत आपलं शतक पूर्ण केलं. क्विंटनने या शतकासह आपला वर्ल्ड कपमधील दरारा कायम ठेवला आहे. तसेच क्विंटनने मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
क्विंटनने 103 बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलं. क्विंटनने 97.09 च्या स्ट्राईक रेटने आणि 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने हे शतक केलं. क्विंटनच्या वनडे कारकीर्दीतील हे 22 वं शतक ठरलं. तसेच क्विंटनने या 13 व्या म्हणजेच आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील हे चौथं शतक ठरलंय. क्विंटनने श्रीलंका टीमचा माजी कर्णधार कुमार संगकारा याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. कुमार संगकारा याने 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये 4 शतकं ठोकली होती. त्यानंतर 8 वर्षांनी कुमार संगकारा याच्या विक्रमाची बरोबरी झाली आहे.
आता रोहित शर्माचा रेकॉर्ड निशाण्यावर
दरम्यान क्विंटनचा डोळा आता टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्या विक्रमावर आहे. रोहित शर्मा याने 2019 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये 5 शतकं झळकावली होती. त्यात दक्षिण आफ्रिका टीमचा पुढील सामना हा टीम इंडिया विरुद्ध आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज त्या सामन्यात डी कॉकला झटपट गुंडाळतात की त्याला रोहितच्या विक्रमाची बरोबरी करु देतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
क्विंटन डी कॉक याचा धमाका सुरुच
Quinton de Kock is making the #CWC23 his own with yet another hundred to his name 🤩@mastercardindia Milestones 🏏#NZvSA pic.twitter.com/LEXQHZZdFX
— ICC (@ICC) November 1, 2023
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, टीम साउथी आणि ट्रेंट बोल्ट.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी.