मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथा कसोटी सामना हा अहमदाबादमध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 480 धावांचा टप्पा ओलांडून टम इंडियाने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला स्वकर्तुत्वावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचायचं असेल तर हा चौथा सामना जिंकणं बंधनकारक आहे. मात्र टीम इंडियाचं भवितव्य हे दुसऱ्या बाजूला सुरु असलेल्या न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका या सामन्यावरही अवलंबून आहे. कारण टीम इंडियाने चौथा सामना गमावल्यास किंवा ड्रॉ केल्यास wtc final ची गणितं ही न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका याच्यातील मालिका निर्णयावर ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला तिसऱ्या कसोटीत पराभूत करत wtc final मध्ये धडक दिली आहे. आता दुसऱ्या जागेसाठी झुंज आहे ती टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात. टीम इंडियाने चौथा सामना जिंकला, तर थेट फायनलमध्ये पोहचेल. तर पराभव किंवा सामना अनिर्णित राहला तर सर्व काही न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका या सीरिजवर अवलंबून असेल.
तसेच श्रीलंकेला अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी न्यूझीलंड विरुद्धचे दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्यात आता पहिल्या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडला विजयासाठी 285 धावांचं आव्हान दिलं आहे. तर न्यूझीलंडने चौथ्या दिवसअखेर 17 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 28 धावा केल्या आहेत. यामुळे आता पाचव्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी 257 धावा तर श्रीलंकेला 9 विकेट्स हव्या आहेत.
यामुळे सामन्याच्या निकालाकडे पाचव्या दिवशी क्रिकेट विश्वाचं लक्ष असेल. हा सामना न्यूझीलंडने जिंकला किंवा अनिर्णित राहिला, तर टीम इंडिया wtc final थेट पोहचेल. पण उलटफेर होत श्रीलंकेने सामना जिंकला, तर टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिंकावं लागेल. अन्यथा टीम इंडियाचं wtc final चं गणित हे जरतरच्या समीकरणावर अवलंबून राहिल.
न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. श्रीलंकेने पहिल्या डावात ऑलआउट 355 धावा केल्या. न्यूझीलंडने पहिल्या इनिंगमध्ये सर्वबाद 373 धावा करत 18 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या डावात 302 धावा करत 285 आव्हान दिलं. त्यापैकी 28 धावा चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडने केल्या. टॉम लॅथम आणि केन विलियमसन हे दोघे नाबाद आहेत. यामुळे आता पाचव्या दिवशी काय होतं, याकडे टीम इंडिया आणि चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन | टिम साउथी (कॅप्टन), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, नील वॅगनर आणि ब्लेअर टिकनर.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन | दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), ओशादा फर्नांडो, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, धनंजया डी सिल्वा, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), कसून रजिथा, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो आणि लाहिरू कुमारा.