ODI World Cup 2023 : आयसीसीच्या तीन नव्या नियमांमुळे स्पर्धा होणार आणखी रंगतदार, काय केलं ते वाचा
ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं 13 वं पर्व आहे. या पर्वात दहा संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. पहिल्यांदाच रॉबिन राउंड पद्धतीने सामने होणार आहे. दुसरीकडे, आयसीसीने तीन नवे नियम आणल्याने स्पर्धेची रंगत वाढणार आहे.
मुंबई : क्रिकेट महाकुंभाची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून आहे. क्रीडाप्रेमी गेल्या अनेक दिवसांपासून या दिवसाची वाट पाहात होते. आता वनडे वर्ल्डकप स्पर्धा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. अशात आयसीसीच्या नव्या नियमांची जोरदार चर्चा रंगली आहे. यामुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढणार आहे. 2019 मध्ये एका नियमामुळे जोरदार वाद झाला होता. हा नियमात देखील आयसीसीने बदल केला आहे. 2019 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड असा सामना झाला होता. मात्र हा सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरमध्ये खेळला गेला. तिथेही बरोबरी साधली गेली. मात्र इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे बराच वाद रंगला होता. अखेर आयसीसीने या नियमात बदल केला आहे.
कोणते तीन नियम नव्याने लागू केले ते जाणून घ्या
- 2019 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चौकारांच्या आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं होता. त्यामुळे सोशल मीडियावर बराच वाद रंगला होता. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर होते. त्यातही बरोबरी झाली तर चौकारांच्या आधारावर विजेता घोषित केला जातो. याच नियमामुळे इंग्लंडला जेतेपद मिळालं होतं. मात्र हा नियम बदलला असून आता विजयी निकाल येईपर्यंत सुपर ओव्हर खेळली जाणार आहे.
- मैदानावरील पंचांचा सॉफ्ट सिग्नल संपुष्टात आला आहे. मैदानातील पंचाना तिसऱ्या पंचांना विचारण्यापूर्वी आधी त्यांचा निर्णय द्यावा लागत होता. त्यामुळे तिसऱ्या पंचांचा निर्णय कधी कधी जवळपास असला तरी मैदानातील पंचाच्या बाजूने जायचा. आऊट असो की नसो मैदानातील पंचांच्या पक्षात निर्णय घेतला जायचा. पण आता हा सॉफ्ट सिग्नल नियम संपुष्टात आला आहे. जर तिसरा पंच बाद की नाबाद ठरवण्यात अपयशी ठरला तरच मैदानातील पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल.
- वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी आयसीसीने आणखी एक नियम जोडला आहे. स्पर्धेतील एकाही स्टेडियमची बाउंड्री 70 मीटरपेक्षा कमी नसेल. काही ठिकाणी सीमारेषा जवळ असल्याने फलंदाज आरामात चौकार आणि षटकारांचा वर्षाव करतो. हे लक्षात घेऊनच हा नियम तयार केला आहे.
भारताचा सामना पहिला सामना कधी?
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 8 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. त्यानंतर 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तान आणि 14 ऑक्टोबरला पाकिस्तानसोबत सामना होईल. भारताला उपांत्य फेरी सहजरित्या गाठण्यासाठी काहीही करून 7 सामने जिंकावे लागणार आहेत.