यशस्वी जयस्वाल याच्या कुटुंबाने या कारणासाठी सोडलं जुनं घर, भाऊ म्हणाला…
यशस्वी जयस्वाल हे भारतीय क्रिकेट विश्वातलं सध्याचं चर्चेतलं नाव आहे. देशांतर्गत स्पर्धा, आयपीएल आणि पदार्पणाच्या कसोटीत यशस्वी जयस्वालची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. इतकं होत असताना त्याच्या कुटुंबाने जुनं घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : डावखुरा यशस्वी जयस्वाल याने क्रिकेट विश्वात नवे विक्रम प्रस्थापित करण्याची सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने तसं करूनही दाखवलं आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याने 171 धावांची खेळी करून अनेक विक्रमांची नोंद केली आहे. डेब्यू सामन्यात शतक करणारा 17 वा भारतीय फलंदाज ठरला आहे. दुसरीकडे त्याने संघात आपली निवड योग्य असल्याचं सिद्ध करून दाखवलं आहे. पहिल्या सामन्यातच त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. भारतीय क्रीडाप्रेमी यशस्वी जयस्वाल याच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहेत. त्याच्याकडून भविष्यात आणखी मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
यशस्वी जयस्वालच्या जुन्या घराबाबत काय झालं
एकीकडे, यशस्वी जयस्वाल विक्रम प्रस्थापित करण्याच्या शर्यतीत असताना त्याच्या कुटुंबात घडामोडी वेगाने घडत आहे. यशासोबत बऱ्याच गोष्टी आता सोप्या होताना दिसत आहे. यशस्वीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुटुंबाची धडपड सुरु आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावरून यशस्वी मायदेशी परतेल तेव्हा त्याला जुन्या घरात राहावं लागणार नाही.
यशस्वी जयस्वालच्या कुटुंबियांनी नव्या घरात प्रवेश केला आहे. पाच रुमच्या प्लॅटमध्ये कुटुंब शिफ्ट झालं आहे. यशस्वीचा भाऊ तेजस्वीने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, “तो आम्हाला वारंवार सांगत होता की लवकरात लवकर शिफ्ट व्हा. मी त्या घरात राहू इच्छित नाही. कसोटी सामन्या दरम्यानंही त्याने शिफ्टिंगबाबत विचारलं होतं. त्याची आयुष्यातील मोठी इच्छा होती. त्याला स्वत:चं घर पाहिजे होतं. तुम्हाला माहिती आहे कोणत्या परिस्थितीत जगला आहे. खासकरून मुंबईत घरं किती महत्त्वाचं ठरतं.”
यशस्वी जयस्वालची क्रिकेट कारकिर्द
यशस्वी जयस्वाल याची देशांतर्गत स्पर्धेतील कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. 15 फर्स्ट क्लास सामन्यात त्याने 80 च्या सरासरीने 1845 धावा केल्या आहेत. यात 9 शतकं आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्येही त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर आता टेस्टमध्ये त्याने आपल्या फलंदाजीची कमाल दाखवून दिली.
वेस्ट इंडिज विरुद्ध यशस्वी जयस्वालची कारकिर्द
यशस्वी जयस्वाल याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात 387 चेंडूंचा सामना केला. यात 16 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 171 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट 44.19 इतका राहिला. द्विशतकाकडे वाटचाल करत असताना अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर जोशुआ डासिल्वाने त्याचा झेल घेतला आणि तंबूचा रस्ता दाखवला.