2011 Cricket World Cup : कॅन्सरशी लढला, मैदानात रक्त सांडलं, मात्र मागे हटला नाही, वर्ल्डकप जिंकलाच!
वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यापर्यंत युवराज जिगर लावून खेळला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरचा अंतिम सामना ज्यावेळी भारताने जिंकला त्यावेळी युवराजच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. | India won the ODI 2011 Cricket World Cup
मुंबई : हाच तो दिवस ज्या दिवशी करोडो भारतवासियांचं स्वप्न 28 वर्षांनंतर पूर्ण झालं. मुंबईच्या वानखेडे मैदानावर पार पडलेल्या 2011 च्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत (2011 Cricket World Cup) कॅप्टन कूल एस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेला (India Vs Sri lanka 2011) धूळ चारुन 2011 चा वर्ल्ड कप उंचावला. या स्पर्धेत भारतीय संघाचा प्रत्येक खेळाडू जीवाची बाजू लावून खेळला. पण या सगळ्यांमध्ये टीम इंडियाचा जिगरबाज खेळाडू युवराज सिंगने (Yuvraj Singh) मैदानावर रक्त सांडेपर्यंत त्वेषाने लढला आणि आपल्या बॅटिंग आणि बोलिंग परफॉर्मन्सने भारतीय संघाला विश्वचषक जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. आज भारतीय संघाने विश्वचषक जिंकून बरोबर 10 वर्ष पूर्ण होत आहेत. (On this day India won the ODI 2011 Cricket World Cup yuvraj Singh Play Important Role)
‘सचिन पाजी’साठी वर्ल्ड जिंकायचा…
2011 चा वर्ल्ड कप म्हणजे क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरचा शेवटचा वर्ल्डकप… काहीही करुन सचिनसाठी हा वर्ल्ड जिंकायचा असा चंगच भारतीय संघाने बांधला होता. तेव्हा पहिल्या मॅचपासून संघातला प्रत्येक खेळाडू जीवाची बाजी लावून खेळत होता. साखळी फेरीत भारताने दमदार कामगिरी करत एक एक मॅच जिंकत बाद फेरीत प्रवेश मिळवला. यादरम्यान वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरने भन्नाट ओपनिंग पार्टनरशीप दिल्या. गौतम गंभीरने क्रमांक तीनला खेळून संयमी खेळी केल्या तर विराट, रैना, युवराज आणि धोनीने त्यांची त्यांची जबाबदारी पार पाडली.
युवराज सिंगचा दृष्ट लागेल असा खेळ…
2011 च्या वर्ल्डकप दरम्यान युवराज सिंग वेदनेने व्याकूळ होता. आपल्याला काहीतरी होतंय. हे त्याला जाणवत होतं. मात्र नक्की काय होतंय, हे कळण्यासाठी त्याला काही दिवस जाऊ द्यावे लागले. वर्ल्ड कपच्या संपूर्ण मॅचेस युवराजने लाजवाब खेळल्या. त्याने वर्ल्डकपमध्ये 362 धावा काढून 15 विकेट्सही मिळवल्या. त्याच्या बॅटिंग आणि बोलिंगने त्याने भल्या भल्यांना विचार करायला भाग पाडलं. या मॅचेस खेळत असताना त्याला एकदा रक्ताची उलटी झाली. मात्र त्यावेळी युवराजने तब्येतीवर लक्ष देण्याऐवजी वर्ल्डकपवर लक्ष देणं पसंत केलं.
वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यापर्यंत तो जिगर लावून खेळला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरचा अंतिम सामना ज्यावेळी भारताने जिंकला त्यावेळी युवराजच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. त्याने केलेल्या कष्टाचं चीज झालं होतं. वर्ल्ड कप संपल्यानंतर त्याने ज्यावेळी वैद्यकीय चाचण्या केल्या त्यावेळी त्याला कॅन्सरचं निदान झाल्याचं समोर आलं. ज्या दिवशी त्याच्या हातात त्याचे वैद्यकीय रिपोर्टस आले त्यावेळी त्याच्या डोळ्यासमोरुन एखादी गाडी वेगात भुर्रकन निघून जावी तसा वर्ल्डकपचा संपूर्ण काळ सर्रकन निघून गेला. परंतु या काळात त्याने गाळलेल्या घामाची किंमत मोत्यांहून अधिक होती. त्याच्या घामाने भारताला वर्ल्ड जिंकता आला, याचं त्याला समाधान मिळालं. अनेकदा त्याने ही गोष्ट बोलून दाखवली तसंच भारतासाठी यादगार मॅचेस खेळता आल्या, ही माझ्यासाठी गर्वाची आणि समाधानाची गोष्ट असल्याचं तो म्हणतो.
(On this day India won the ODI 2011 Cricket World Cup yuvraj Singh Play Important Role)
हे ही वाचा :
वादग्रस्त अंपायर्स कॉल निर्णयावर आयसीसीचा मोठा निर्णय, DRS नियमांमध्ये 3 मोठे आणि महत्त्वाचे बदल!
Video : न्यूझीलंडच्या विकेट कीपरची चलाख स्टम्पिंग, क्रिकेट फॅन्सला धोनीची आठवण, एकदा व्हिडीओ पाहाच…
हार्दिक पांड्याच्या जेवणावर कावळ्यांचा अटॅक, नताशाची अशी रिअॅक्शन…