IPL 2024 Orange Cap: ऑरेंज कॅपच्या जागेवर विराट कोहलीचं बस्तान, तिथपर्यंत पोहोचणं फलंदाजांना झालं कठीण
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा हुकूमाचा एक्का आणि माजी कर्णधार विराट कोहलीच्या शतकी खेळीमुळे ऑरेंज कॅपचं गणित फिस्कटलं आहे. त्यामुळे इतर खेळाडूंना रेसमध्ये येण्यासाठी मोठी खेळी करावी लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीच्या डोक्यावर ऑरेंज कॅप कायम आहे.
विराट कोहलीची ख्याती रनमशिन्स म्हणून आहे. याची प्रचिती आयपीएल 2024 स्पर्धेतही आली आहे. अवघ्या पाच सामन्यात विराट कोहलीने आपला रंग दाखवला आहे. विराट कोहलीने पाच सामन्यात दोन अर्धशतकं आणि एक शतक ठोकलं आहे. त्यामळे अवघ्या पाच सामन्यात विराट कोहलीच्या 316 धावा झाल्या आहे. संघाची कामगिरी चांगली नसली तरी विराट कोहलीच्या नावाची चर्चा मात्र रंगली आहे. विराट कोहलीचा हा फॉर्म कायम राहिला तर त्याच्या आसपास पोहोचणंही इतर खेळाडूंना शक्य होणार नाही. विराट कोहलीचा हा फॉर्म पाहता त्याचं टी20 वर्ल्डकपसाठी नाव जवळपास निश्चित झालं आहे. टी20 वर्ल्डकप संघाची घोषणा 30 एप्रिल किंवा 1 मे रोजी होणार आहे. त्यावेळेस विराट कोहलीचं नाव संघात असेल आश्चर्य वाटायला नको.दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यानंतरही विराट कोहलीचं अव्वल स्थान अबाधित आहे.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन आहे. त्याने 5 सामन्यात 191 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे यात एकही अर्धशतक किंवा शतक नाही. तिसऱ्या स्थानावर हैदराबादचा हेन्रिक क्लासेन पोहोचला आहे. त्याने पंजाब विरुद्धच्या सामन्यात 9 धावा करत रियान पराग आणि शुबमन गिलला मागे टाकलं आहे. हेन्रिक क्लासेनच्या एकूण 186 धावा आहेत. चौथ्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा रियान पराग आहे. त्याने 4 सामन्यात दोन अर्धशतकांच्या जोरावर 185 धावा केल्या आहेत.पाचव्या स्थानावर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल आहे. त्याने पाच सामन्यात एका अर्धशतकासह 183 धावा केल्या.
सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 9 गडी गमवून 182 धावा केल्या आणि विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं. तर पंजाब किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 180 धावा केल्या. फक्त दोन धावा विजयासाठी कमी पडल्या आणि पंजाबचा पराभव झाला. आशुतोष शर्माने शेवटच्या षटकात विजय मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र त्यात यश मिळलं नाही. आयपीएल पॉइंट टेबलमध्ये फारशी काही उलथापालथ झालेली नाही. सनरायझर्स हैदराबादला 2 गुणांचा फायदा झाला आहे. पण सहाव्या स्थानावरच समाधान मानावं लागलं आहे. तर पंजाब किंग्स 4 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.