16 मुलं, वाह…! अंतर किती? अक्रम, गिलख्रिस्ट आणि वॉनने पाकिस्तानी क्रिकेटपटूची लाज काढली
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानने गमावला. पण या सामन्यात अनेक किस्से घडले. समालोचनावेळी वसीम अक्रमने तर पाकिस्तानच्या क्रिकेटपटूबाबत धक्कादायक खुलासा केला. यावेळी गिलख्रिस्ट आणि वॉनने फिरकी घेतली.
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धचा पहिला वनडे सामना 2 विकेट राखून जिंकला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने 46.4 षटकात सर्व गडी गमवून 203 धावा केल्या आणि विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 33.3 षटकात 8 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात कामरान गुलाम आणि पॅट कमिन्सची ठसन चर्चेचा विषय ठरली. दुसरीकडे, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने आपल्याच देशातील क्रिकेटपटूची लाज काढली. समालोचनावेळी त्याने एक गोष्ट सांगितली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू एडम गिलख्रिस्ट आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉन यांना धक्का बसला. वसीम अक्रमने लाईव्ह समालोचन सुरु असताना सांगितलं की, कामरान मोठ्या कुटुंबातून आला आहे. 12 भावंडांमध्ये त्याचा 11वा क्रमांक लागतो. या शिवाय त्याला चार बहिणीही आहेत. म्हणजेच कामरानचं कुटुंब हे 16 जणांचं आहे. त्याच्या कुटुंबाचा उल्लेख वसीम अक्रमने केला. त्यानंतर मायकल वॉन आणि एडम गिलख्रिस्ट यांनी प्रतिक्रिया दिली.
वसीम अक्रमने असं सांगताच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने तात्काळ प्रतिक्रिया देत सांगितलं की, 16 मुलं..वाह! या भावंडांमध्ये वयाचं अंतर किती असेल हे जाणून घेणं उत्सुकतेचं ठरेल. मायकल वॉनने असं म्हणताच एडम गिलख्रिस्टही त्यात पडला आणि म्हणाला, पाकिस्तान निवड समिती… तिन्ही माजी क्रिकेटपटूंचं हे वक्तव्य व्हायरल होत आहे. इतकंच काय तर अनेकांनी या तिघांवर टीकेची झोडही उठवली आहे. क्रिकेटपटूंनी अशा कमेंट्सपासून दूर राहवं अशी टीका अनेकांनी केली आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. कामरान गुलाम काही खास करू शकला नाही. फक्त 5 धावा करून बाद झाला. पण त्याच्या मैदानातील किस्से पहिल्याच वनडेत चर्चेचा विषय ठरला आहे. सीन एबॉट बॅटिंग करत असताना त्याला डिवचण्याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा वनडे सामना 8 नोव्हेंबरला होणार आहे.