PAK vs BAN: बांगलादेशला पाकिस्तान विरुद्ध पहिल्या कसोटीत इतिहास रचण्याची संधी
Pakistan vs Bangladesh 1st Test: पाकिस्तान आणि बांगलादेश दोन्ही संघ 3 वर्षांनी पुन्हा एकदा कसोटी मालिकेत भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला 21 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना हा रावळपिंडी येथे सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. आधी हा सामना कराची येथे खेळवण्यात येणार होता. मात्र कराची स्टेडियमचं दुरूस्तीचं काम सुरु असल्याने या मालिकेतील दोन्ही सामने हे रावळपिंडी येथेच होणार आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांसाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळी फेरीच्या हिशोबाने फार महत्त्वाची आहे. पाकिस्तानने या सलामीच्या सामन्यासाठी सोमवारी 19 ऑगस्ट रोजी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. पाकिस्तान तब्बल 28 वर्षांनंतर मायदेशात कोणत्याही स्पिनरशिवाय कसोटी सामना खेळणार आहे.
बांगलादेशकडे इतिहास रचण्याची संधी
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 13 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. पाकिस्तानने या 13 पैकी 12 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना हा अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे बांगलादेशला अद्याप पाकिस्तान विरुद्ध एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे बांगलादेशला पाकिस्तान विरुद्ध एक विजय मिळवून इतिहास रचण्याची संधी आहे.
3 वर्षांनंतर कसोटी मालिका
दरम्यान उभयसंघात 3 वर्षांनंतर कसोटी मालिका होत आहे. त्याआधी 2021 साली दोन्ही संघ भिडले होते. तेव्हा पाकिस्तानने एक डाव आणि 8 धावांनी हा सामना जिंकला होता. तसेच दोन्ही संघात 2001 साली पहिल्यांदा कसोटी सामना झाला होता. पाकिस्तानने मुल्तानमध्ये झालेला हा सामना डाव आणि 264 धावांनी जिंकला होता.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), सौद शकील (उपकर्णधार) अब्दुल्लाह शफीक, सॅम अय्युब, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान अली आघा, शाहीन शाह अफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहझाद आणि मोहम्मद अली.
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश टीम: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटॉन कुमार दास, मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, शरीफुल इस्लाम, हसन महमूद, तस्कीन अहमद आणि सय्यद खालेद अहमद.