PAK vs BAN: लिटनचं शतक-मेहदीचं अर्धशतक, बांगलादेश 262वर ऑलआऊट, पाकिस्तानला 12 धावांची नाममात्र आघाडी
Pakistan vs Bangladesh 2nd Test: बांगलादेशला 50 धावा करता येतील की नाही, अशी स्थिती होती. मात्र लिटन दास आणि मेहदी हसन मिराज जोडीने केलेल्या 165 धावांच्या भागीदारीमुळे बांगलादेशला 262 धावांपर्यंत मजल मारता आली.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. सामन्यातील तिसऱ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव हा 262 धावांवर आटोपला आहे. त्यामुळे पाकिस्तानला नाममात्र का होईना 12 धावांची आघाडी मिळाली आहे. पाकिस्तानने पहिल्या डावात ऑलआऊट 274 धावा केल्या. बांगलादेशची प्रत्युत्तरात घसरगुंडी झाली. बांगलादेशने 26 धावांवर 6 विकेट्स गमावल्या. मात्र लिटन दास आणि मेहदी हसन मिराज या जोडीने 165 धावांची भागीदारी केली. त्यामुळे बांगलादेशला 250 पार मजल मारता आली. परिणामी पाकिस्तानला मोठी आघाडी मिळाली नाही.
घसरगुंडी मग लिटनने सावरलं
बांगलादेशची पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर बिकट स्थिती झाली होती. झाकीर हसन 1, शादमन इस्लाम 10, नजमूल हुसैन शांतो 4, मोमिनुल हक 1, मुशफिकुर रहमान 3 आणि शाकिब अल हसन 2 धावांवर आऊट झाला. त्यामुळ बांगलादेशची स्थिती 6 बाद 26 अशी झाली. मात्र तिथून लिटन दास आणि मेहदी हसन मिराज या दोघांनी सातव्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली. बांगलादेशने या भागीदारीच्या जोरावर कमबॅक केलं. ही जोडी पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरत होती. अखेर खुर्रम शहजाद याने ही जोडी फोडली. खुर्रमने मेहदीला 78 धावांवर आऊट केलं. मेहदीने 124 बॉलमध्ये 78 रन्स केल्या. मेहदीने या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकार ठोकला. मेहदीनंतर तास्किन अहमद 1 धाव करुन माघारी परतला.
त्यानंतर लिटनने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने बांगलादेशचा डाव पुढे नेत शतक झळकावलं. लिटनने या दरम्यान शतक झळकावलं. लिटनच्या कारकीर्दीतील हे चौथं शतक ठरलं. लिटनने नवव्या विकेटसाठी हसन महमुद याच्यासह 69 धावांची भागीदारी केली. बांगलादेशने उर्वरित 2 विकेट्स एकाच ओव्हरमध्ये 2 बॉलच्या अंतराने गमावले. लिटन दास आऊट झाला. लिटनने 228 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 13 फोरसह 138 रन्स केल्या. लिटननंतर नाहिद राणा झिरोवर आऊट झाला आणि बांगलादेशचा डाव 78.4 ओव्हरमध्ये 262 धावांवर आटोपला. हसन महमुद 13 धावांवर नाबाद परतला. तर पाकिस्तानकडून खुर्रम शहजाद याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तर मीर हामझा आणि आघा सलमान या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानला 12 धावांची आघाडी
.@SalmanAliAgha1 gets the last two wickets ☄️
Bangladesh are all out for 262 as Pakistan earn a 12 runs lead 🏏#PAKvBAN | #TestOnHai pic.twitter.com/YPRVEz9tzV
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 1, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, खुर्रम शहजाद, अबरार अहमद, मीर हमजा आणि मोहम्मद अली.
बांगलदेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन, मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, तस्किन अहमद आणि नाहिद राणा.