PAK vs BAN: बांगलादेशचा ऐतिहासिक मालिका विजय, दुसर्या कसोटीत पाकिस्तानचा 6 विकेट्सने धुव्वा
Pakistan vs Bangladesh 2nd Test Highlights In Marathi: बांगलादेशने इतिहास रचला आहे. बांगलादेशने पाकिस्तानला घरात घुसून 2-0 अशा फरकाने लोळवलं आहे.
बांग्लादेश क्रिकेट टीमने इतिहास रचला आहे. बांगलादेशने दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. बांगलादेशने या विजयासह पाकिस्तानचा 2-0 अशा फरकाने सुपडा साफ केला आहे. पाकिस्तानने बांगलादेशला विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेशने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 42 धावा केल्या आहेत. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी आणखी 143 धावांची गरज होती. बांगलादेशने पाचव्या दिवशी 4 विकेट्स गमावून 56 ओव्हरमध्ये या धावा पूर्ण केल्या. बांगलादेशचा हा पाकिस्तानमध्ये पहिलाच मालिका विजय ठरला. तर पाकिस्तानला घरात मालिका गमवावी लागल्याने त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
बांगलादेशकडून दुसऱ्या डावात झाकीह हसन याने सर्वाधिक धावा केल्या. झाकीरने 39 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह 40 रन्स केल्या. कॅप्टन नजमूल हुसैन शांतोने 82 चेंडूत 38 धावांचं योगदान दिलं. मोमिनुल हकने 34 धावांची खेळी केली. शादमन इस्लामने 24 रन्स केल्या. तर मुशफिकुर रहीम आणि शाकिब अल हसन या अनुभवी जोडीने बांगलादेशला विजय मिळवून दिला. शाकिब-मुशफिकुर या दोघांनी नाबाद अनुक्रमे 21 आणि 22 अशा धावा केल्या. तर पाकिस्तानकडून मीर हामझा, खुर्रम शहजाद अब्रार अहमद आणि आघा सलमान या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
सामन्याबाबत थोडक्यात
सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. त्यानंतर पाकिस्तानने पहिल्या डावात 85.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट 274 धावा केल्या. बांगलादेशची प्रत्युत्तरात बिकट स्थिती झाली होती. बांगलादेशने 26 धावांवर 6 विकेट्स गमावल्या. मात्र त्यानंतर लिटन दास आणि मेहदी हसन मिराज या दोघांनी सातव्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली. या दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे बांगलादेशला पहिल्या डावात 262 धावांपर्यंत मजल मारता आली. लिटन दासने 138 धावा केल्या. तर मेहदीने 78 धावांचं योगदान दिलं. दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे पाकिस्तानला फक्त 12 धावांची आघाडी मिळाली.
बांगलादेशने पाकिस्तानला दुसऱ्या डावात 46.4 ओव्हरमध्ये 172 धावांवर रोखलं. त्यामुळे बांगलादेशला 185 धावांचं आव्हान मिळालं. बांगलादेशने हे आव्हान सहज पूर्ण करत पाकिस्तानला 2-0 अशा फरकाने क्लिन स्वीप केलं.
बांगलादेशचा ऐतिहासिक मालिका विजय
Bangladesh clinch their first Test series win against Pakistan 🤩#WTC25 | #PAKvBAN 📝: https://t.co/mhkrlhMLyU pic.twitter.com/hqlZbQZlOE
— ICC (@ICC) September 3, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, खुर्रम शहजाद, अबरार अहमद, मीर हमजा आणि मोहम्मद अली.
बांगलदेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन, मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, तस्किन अहमद आणि नाहिद राणा.