PAK vs BAN : दुसऱ्या दिवशीच पाकिस्तानवर ओढावली नामुष्की, अख्खा संघ दिवस संपेपर्यंत तंबूत परतला
पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून बांगलादेशने 1-0 ने आघाडी घेतली आहे. दोन सामन्यांची मालिका असल्याने पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई आहे. असं असताना दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा संपूर्ण संघ तंबूत परतला आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून बांग्लादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अगदी योग्य ठरला असं दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा म्हणता येईल. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे उरलेल्या चार दिवसात पाकिस्तानची कसोटी लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या फलंदाजांनी निराशा केली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 274 धावांवर बाद झाला. सइम अयुब, कर्णधार शान मसूद आणि अघा सलमान वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी बांगलादेशने पकड मिळवली असंच म्हणता येईल. त्यात सोमवार आणि मंगळवारी रावलपिंडीत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ही मालिका बांग्लादेश जिंकू शकते असं चित्र आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने बिन बाद 10 धावा केल्या आहेत. अजूनही पाकिस्तानकडे 264 धावांची आघाडी आहे.
पाकिस्तानकडून फलंदाजीसाठी आलेल्या अब्दुल्ला शफीकने नकोशी सुरुवात करून दिली. शून्यावर बाद झाल्याने दडपण आलं. त्यानंतर सइम अयुब आणि शान मसूद यांनी डाव सावरला. दोघांनी मिळून 107 धावांची भागीदारी केली. सइम अयुबने 58 धावा, कर्णधार शान मसूदने 57 धावांची खेळी केली. बाबर आझम या सामन्यातही फेल गेला. त्याला फक्त 31 धावा करता आल्या. सउद शकील 16, मोहम्मद रिझवान 29 धावा करून बाद झाले. तर अघा सलमानने मधल्या फळीत डाव सावरला. त्याने 54 धावांची खेळी केली. खुर्रम शहजाद 12, मोहम्मद अली 2 आणि अब्रार अहमद 9 धावा करून बाद झाले.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, सइम अयुब, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, खुर्रम शहजाद, अबरार अहमद, मोहम्मद अली, मीर हमजा.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन, मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, तस्किन अहमद, नाहिद राणा.