PAK vs BAN : शाहीन आफ्रिदीला बांग्लादेश दौऱ्यातून डावलणार! कारण की…
पाकिस्तानचा संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी पाकिस्तान संघात कोण असेल याची खलबतं सुरु आहेत. पुढच्या महिन्यात हा दौरा असणार आहे. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मात्र या दौऱ्यातून शाहीन आफ्रिदीला वगळलं जाण्याची शक्यता आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवानंतर पाकिस्तान संघ ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. तसेच संघात फूट असल्याचं कळल्याने आगीत तेल ओतलं गेलं आहे.त्यामुळे पाकिस्तान संघात बरीच उलथापालथ सुरु झाली आहे. निवड समितीतही काही जणांची उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान, शाहीन शाह आफ्रिदीबाबत कोचिंग स्टाफने तक्रार केली आहे. कसोटी प्रशिक्षकपदाची जबाबदारी जेसन गिलिस्पीच्या खांद्यावर आहे. आता कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानी संघ बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहे. मात्र या दौऱ्यात शाहीन शाह आफ्रिदी नसेल, असं सांगण्यात येत आहे. या मागची बरीच कारणं जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने सांगत आहे. आता या मागचं मुख्य कारण समोर आलं आहे. पाकिस्तानचा कोच जेसन गिलिस्पीने सांगितलं की, शाहीन शाह आफ्रिदीचं बांग्लादेश दोऱ्यात खेळणं निश्चित नाही. गिलिस्पीने जियो टीव्हीशी बोलताना सांगितलं की, “शाहीन लवकरच वडील होणार आहे. जर त्याची इच्छा असेल तर सिरीजसाठी आराम दिला जाऊ शकतो.” बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना 21 ऑगस्ट आमि दुसरा कसोटी सामना 30 ऑगस्टला आहे. दरम्यान, पाकिस्तानचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिप गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.
शान मसूदच्या नेतृत्त्वात पाकिस्तानचा संघ बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहे. शाहीन आफ्रिदीने न खेळण्यााच निर्णय घेतला तर खुर्रम शहजाद आणि मीर हमजा यांना पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीत समाविष्ट केलं जाईल. फहीम अश्रफला बाजूला केलं जाण्याची शक्यता आहे. तर आमेर जमाला अष्टपैलू म्हणून संघात स्थान मिळू शकते. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली फलंदाजी केली होती. तर फलंदाजीची धुरा अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक आणि बाबर आझम यांच्या खांद्यावर असेल. तर कर्णधार मसूद, सउद शकील आणि अघा सलमान यांच्या खांद्यावर मधल्या फळीची जबाबदारी असू शकते.
बांगलादेश कसोटीसाठी पाकिस्तानचा संभाव्य संघ : अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), अघा सलमान, साहिबजादा फरहान, आमेर जमाल, खुर्रम शहजाद, मीर हमजा, अबरार अहमद, नसीम शाह, हसन अली , नोमान अली/साजिद खान