PAK vs ENG : इंग्लंडची पहिल्या कसोटीवर घट्ट पकड, विजयापासून 4 विकेट्स दूर, पाकिस्तान लाजीरवाण्या पराभवाच्या छायेत
Pakistan vs England 1st Test Day 4 Highlights In Marathi: पाकिस्तानला पहिल्या डावात 556 धावा करुनही इंग्लंड विरुद्ध डावाने पराभव स्वीकारावा लागू शकतो. जाणून घ्या चौथ्या दिवशी काय काय झालं?
इंग्लंड क्रिकेट टीमने पाकिस्तान विरूद्धच्या मुलतानमधील कसोटी सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. इंग्लंड विजयी सुरुवात करण्यापासून फक्त 4 विकेट्स दूर आहे. चौथ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी खोऱ्याने धावा केल्या. इंग्लंडने पहिला डाव 7 बाद 823 धावांवर घोषित केला. इंग्लंडने यासह पहिल्या डावात 267 धावांची आघाडी घेतली. पाकिस्तानची दुसऱ्या डावात घसरगुंडी झाली. पाकिस्तानने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 6 विकेट्स गमावून 152 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तान अजून 115 धावांनी पिछाडीवर आहे. तर त्यांच्या हातात फक्त 4 विकेट्सच आहेत. त्यामुळे पाकिस्तानवर डावाने पराभूत होण्याची नामुष्की आहे.
चौथ्या दिवसाच्या खेळाचा आढावा
इंग्लंडने 3 बाद 492 धावांपासून दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. जो रुट आणि हॅरी ब्रूकने वरचढ होऊन बॅटिंग केली. या दोघांसमोर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. रुटने या कसोटी कारकीर्दीतील सहावं द्विशतक ठोकलं. तर बॅरी ब्रूकनेही पहिलंवहिलं द्विशतक झळकावलं. या दोघांनी इंग्लंडकडून सर्वात मोठी भागीदारीचा कारनामा केला. ब्रूक-रुटने चौथ्या विकेटसाठी 454 धावांची भागीदारी केली. सलमान आघा याने ही जोडी फोडली. जो रुट 274 धावांवर नाबाद परतला. रुटनंतर ब्रूकने फटकेबाजी सुरुच ठेवत त्रिशतक झळकावलं. ब्रूकने 317 धावांची खेळी केली. जेमी स्मिथ याने 31* तर ख्रिस वोक्स याने नाबाद 17 धावा केल्या. इंग्लंडने अशाप्रकारे 7 बाद 823 धावांवर पहिला डाव घोषित केला. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि समॅ अय्यूब या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानची घसरगुंडी
पाकिस्तानची दुसर्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर घसरगुंडी झालेली पाहायला मिळाली. अब्दुल्लाह शफीक पहिल्याच बॉलवर आऊट झाला. कॅप्टन शान मसूद 11 धावांवर माघारी परतला. बाबर आझम 5 धावा करुन आऊट झाला. सॅम अय्युबने 11 धावा केल्या. मोहम्मद रिझवानने 10 धावा जोडल्या. सऊद शकीलने 29 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर दिवसाचा खेळ संपेपर्यंत सलमान आगाह 41 आणि आमेर जमाल 27 धावांवर नाबाद आहेत. तर इंग्लंडकडून गस एटकीन्सन आणि ब्रायडन कार्स या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या आहेत.
इंग्लंड विजयापासून 4 विकेट्स दूर
That is some day 😍
We score 331 runs and take 6 wickets to take control 👏
Match Centre: https://t.co/M5mJLlHALN
🇵🇰 #PAKvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/uXQGT5EeCS
— England Cricket (@englandcricket) October 10, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि अबरार अहमद.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस एटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॅक लीच आणि शोएब बशीर.