PAK vs ENG: इंग्लंडकडून टीम इंडियाला दे धक्का, पाकिस्तानमध्ये 20 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक
England vs Pakistan Multan 1st Test : इंग्लंडने मुल्तान क्रिकेट स्टेडियममध्ये पाकिस्तानच्या 556 धावांच्या प्रत्युत्तरात 823 धावांवर पहिला डाव घोषित केला. इंग्लंडने या दरम्यान टीम इंडियाचा मोठा रेकॉर्ड उद्धवस्त केला.
बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्याच घरात कसोटी मालिकेत 2-0 लोळवलं. त्यानंतर आता इंग्लंडने पाकिस्तानवर पहिल्या कसोटीत कुरघोडी केली आहे. इंग्लंडने मुल्तानमधील पहिल्या सामन्यात विक्रमाची रांग लावली आहे. पाकिस्तानकडून पाकिस्तानकडून एकाने दीडशतक तर दोघांनी शतकी खेळी केली. तर प्रत्युत्तरात इंग्लंडकडून एकाने त्रिशतक तर दुसऱ्याने द्विशतक झळकावलं. इंग्लंडने या दरम्यान टीम इंडियाचा 20 वर्षांआधीचा विक्रम मोडीत काढला. पाकिस्तानमध्ये कोणत्याही पाहुण्या संघाकडून सर्वाधिक धावांचा विक्रम हा टीम इंडियाच्या नावावर होता. टीम इंडियाने 2004 साली मुल्तानमध्ये 5 विकेट्स गमावून पहिला डाव हा 675 धावांवर घोषित केला होता. वीरेंद्र सेहवागने याच सामन्यात त्रिशतक केलं होतं. तर सचिन तेंडुलकरने नाबाद 194 धावा केल्या होत्या. तर आता इंग्लंड टीम इंडियापुढे निघाली. इंग्लंडने पहिला डाव हा 7 बाद 823 धावांवर घोषित केला.
त्याआधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा केल्या. कॅप्टन शान मसूदने सर्वाधिक 151 धावांची खेळी केली. तर सलमान आघाने 104* आणि अब्दुल्ला शफीकने 102 धावा केल्या. इंग्लंडची प्रत्युत्तरात निराशाजनक सुरुवात झाली. कॅप्टन ओली पोप याला भोपळाही फोडता आला नाही. मात्र त्यानंतर इंग्लंडने पाकिस्तानला पूर्णपणे चितपट केलं.
जो रुटने 375 बॉलमध्ये 262 रन्स केल्या. रुटने या दरम्यान अनेक विक्रम आपल्या नावावर केले. रुटने या खेळीसह 20 हजार आंतरराष्ट्रीय धावा केल्या. तर झॅक क्रॉली याने 78 आणि बेन डकेटने 84 धावा केल्या. तर हॅरी ब्रूकने सर्वाधिक 317 धावा केल्या.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि अबरार अहमद.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस एटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॅक लीच आणि शोएब बशीर.