इंग्लंड क्रिकेट टीमने पाकिस्तान दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. उभयसंघातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा मुलतानमध्ये खेळवण्यात आला. इंग्लंडने हा सामना पाचव्या दिवसातील पहिल्या सत्रात जिंकला. इंग्लंडने पाकिस्तानचा 1 डाव आणि 47 धावांनी धुव्वा उडवला. पाकिस्तानसाठी हा त्यांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला आहे. तसेच 147 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तान अशा पद्धतीने सामना गमावणारी पहिलीच टीम ठरली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशा अपमानास्पद पद्धतीने कोणत्याच संघाचा पराभव झाला नव्हता.
पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा केल्या. पाकिस्तानने अप्रतिम सुरुवात केली होती. त्यामुळे सामना ड्रॉच होणार अशीच चिन्हं होती. मात्र साम्न्यातील चौथ्या दिवशी सर्व समीकरणं बदलली. शेवटच्या सत्रात गेम असा बदलला की पाकिस्तानला डाव आणि 47 धावांनी पराभूत व्हावं लागलं. पाकिस्तान कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या डावात 500 पेक्षा अधिक धावा करुनही पराभूत होणारी पहिलीच टीम ठरली आहे.
इंग्लंडने पाकिस्तानच्या 556 च्या प्रत्युत्तरात पहिला डाव हा 823 धावांवर जाहीर केला. इंग्लंडने अशाप्रकारे 267 धावांची आघाडी घेतली. मात्र पाकिस्तानला दुसऱ्या डावात 220 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि इंग्लंडने विजय मिळवला. पाकिस्तानने पाचव्या दिवसाची सुरुवात 4 बाद 152 पासून सुरुवात केली. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी पहिल्या सत्रातच पाकिस्तानला 6 झटके देत गुंडाळलं.
दरम्यान हॅरी ब्रूक आणि जो रुट ही जोडी इंग्लंडच्या विजयाची शिल्पकार ठरली. रुटने 262 धावा केल्या. तर हॅरी ब्रूकने 317 धावांची खेळी केली. हॅरी इंग्लंडकडून 34 वर्षांनी आणि वेगवान त्रिशतक करणारा पहिला फलंदाज ठरला. या दोघांनी इंग्लंडसाठी कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च धावांची भागीदारी केली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 454 धावा जोडल्या. तर जॅक लीच याने दोन्ही डावात मिळून एकूण 7 विकेट्स घेतल्या.
इंग्लंड अशी जिंकली
England win the first Test in Multan.#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/PyFZFej9uv
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 11, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि अबरार अहमद.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस एटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॅक लीच आणि शोएब बशीर.