पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात मुल्तान येथे दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने पाकिस्तानला दुसऱ्या दिवशी 366 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी या धावांचा पाठलाग करायला सुरुवात केली. इंग्लंडने 125 धावांवर 2 विकेट्स गमावल्या. झॅक क्रॉली 27 आणि ओली पोप याने 29 धावा केल्या. त्यानंतर बेन डकेट आणि जो रुट या दोघांनी डाव सावरत इंग्लंडला चांगल्या स्थितीत आणलं. ओपनर बेन डकेट याने या दरम्यान शतक ठोकलं. डकेटने या शतकादरम्यान खास कारनामा करत वीरेंद्र सेहवाग याच्यापेक्षाही खास रेकॉर्ड केला.
बेन डकेट याने 39 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर आघा सलमान याला चौकार ठोकत शतक पूर्ण केलं. डकेटने 85.83 च्या स्ट्राईक रेटने 120 बॉलमध्ये 15 चौकारांच्या मदतीने 103 धावा केल्या. डकेटच्या कसोटी कारकीर्दीतील हे एकूण चौथं, इंग्लंड बाहेरील आणि आशियातील तिसरं तर पाकिस्तान विरुद्धचं दुसरं शतक ठरलं. डकेटने त्याआधी 47 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं.
बेन डकेट याने या शतकी खेळी दरम्यान खास कारनामा केला. डकेटने कसोटी कारकीर्दीतील 2 हजार धावा पूर्ण केल्या. डकेटने सर्वोत्तम स्ट्राईक रेटने या धावांचा टप्पा पार केला. डकेटने 87.10 च्या स्ट्राईक रेटने हा पल्ला गाठला. डकेटचा हा स्ट्राईक रेट टीम इंडियाचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याच्यापेक्षाही जास्त आहे. इतकंच नाही, तर डकेटने 8 व्यांदा 100 पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने अर्धशतक झळकावलं. डकेटने यासह जो रुट आणि ब्रँडन मॅक्युलम यांची बरोबरी केली. याबाबतीत वीरेंद्र सेहवाग नंबर 1 आहे. सेहवागने तब्बल 17 वेळा कसोटी 100 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने अर्धशतकी खेळी केली आहे.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कर्णधार), सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, नोमान अली, साजिद खान आणि जाहिद महमूद.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), मॅथ्यू पॉट्स, ब्रायडन कार्स, जॅक लीच आणि शोएब बशीर.