PAK vs IND Asia Cup 2023 | टीम इंडिया -पाकिस्तान यांच्यात पावसाचा विजय, सामना रद्द
pakistan vs india asia cup 2023 match result | पावसाने टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर पाणी फेरल्याने हा महामुकाबला अखेर रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे चाहते नाराज आहेत.
पल्लेकेले | क्रिकेट चाहत्यांची हिरमोड करणारी वाईट बातमी समोर आली आहे. पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील आशिया कप 2023 मधील तिसरा सामना हा अखेर पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सातत्याने होणाऱ्या पावसामुळे नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला. टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 267 धावांचं आव्हान दिलेलं. मात्र दुसऱ्या डावाला पावसाच्या व्यत्ययामुळे सुरुवात होऊच शकली नाही. त्यामुळे मॅच रेफरी यांनी दोन्ही कर्णधारांच्या संमतीने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
पावसामुळे सामन्यावर ‘पाणी’
टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 267 धावांचं आव्हान ठेवलं. त्यामुळे क्रिकेट चाहते टीम इंडियाच्या बॉलिंगच्या प्रतिक्षेत होते. टीम इंडियाला विजयासाठी 10 विकेट्स आणि पाकिस्तानला 267 धावांची आवश्यकता होती. पहिला डाव संपल्यानंतर आता दोन्ही संघ मैदानात येण्याची वाट पाहत होते. पण कसलं काय पाऊस थांबायचा नावच घेईना. अंपायर्स 9 वाजता पीचची पाहणी करतील, अशी माहिती देण्यात आली. बीसीसीआयने दिलेली वेळ निघून गेली.
बीसीसीआयकडून पुढील कोणतीच माहिती देण्यात आली नाही. मात्र त्यानंतर सामनाधिकारी म्हणजे मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी पाकिस्तान कॅप्टन बाबर आझम आणि टीम इंडिया कॅप्टन रोहित शर्मा यांच्याशी संवाद साधला. दोन्ही कर्णधारांच्या सामंजस्याने सामना रद्द करण्याचा निर्णय झाला. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन केलं. अशाप्रकारे भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला. सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट देण्यात आला.
पावसाची बॅटिंग आणि पावसाचाच विजय
The match has been called off ☹️
Pakistan and India share points with the rain cutting off a promising contest ⛈#AsiaCup2023 | #INDvPAK | 📝: https://t.co/5UWT3ziUDg pic.twitter.com/XBXtRvRFBc
— ICC (@ICC) September 2, 2023
टीम इंडियाची बॅटिंग
दरम्यान त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर टीम इंडिया टॉप ऑर्डर अपयशी ठरली. रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल झटपट आऊट झाले. त्यानंतर ईशान किशन आणि हार्दिक पंड्या या दोघांनी 138 धावांची भागीदारी केली. हार्दिकने सर्वाधिक 87 आणि ईशानने 82 धावा केल्या.
त्यानंतर रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर या दोघांनी नाराज केलं. कुलदीप यादव 4 धावांवर आऊट झाला. तर जसप्रीत बुमराह याने 16 रन्स केल्या. तर मोहम्मद सिराज नाबाद परतला. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने याने 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हरीस रऊफ आणि नसीम शाह या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हारिस रऊफ.