Asia Cup 2023 | पावसामुळे पुन्हा टीम इंडिया-पाकिस्तान सामना रद्द! चाहत्यांसाठी वाईट बातमी
India vs Pakistan Weather and Forecast Update 10 September | टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 10 सप्टेंबरला सुपर 4 मधील सामना खेळला जाणार आहे. हा सामनाही पावसामुळे रद्द होऊ शकतो.
कोलंबो | टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील आशिया कपमधील साखळी फेरीतील सामना हा पावसामुळे रद्द करावा लागला. हा सामना 2 सप्टेंबरला पार पडला. मात्र वारंवार पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता आशिया कपमधील सुपर 4 फेरीला सुरुवात झाली आहे. पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी सुपर 4 मध्ये भिडणार आहेत. हा महामुकाबला 10 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. पावसामुळे पहिला सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे आता या सामन्यात तरी थरार पाहता येईल, अशी आशा क्रिकेट चाहते लावून होते. मात्र त्यांच्या आशेवर पाणी फेरणारी बातमी समोर आली आहे.
पाकिस्तान आणि टीम इंडियाने ग्रुप 1 मधून सुपर 4 मध्ये एन्ट्री केली आहे. हे दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने येणार असल्याने क्रिकेट विश्वात आनंदाचं वातावरण आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे हा सामनाही पावसामुळे रद्द होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सुपर 4 मधील सामना हा कोलंबोत होणार आहे. हवामान खात्याने सामन्याच्या दिवशी एकूण हवामान कसं असेल याबाबतची माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाऊस या सामन्याचा बेरंग करु शकतो. एक्युवेदनुसार, कोलंबोत सामन्याच्या दिवशी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी पाऊस होणार असल्याची 70 टक्के शक्यता आहे. इतकंच नाही, तर दिवसभर जोरदार वारे वाहणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच कोलंबोत वादळ येण्याची 45 टक्के शक्यता आहे. तसेच सामन्याच्या दिवशी रात्री पाऊस आणखी जोरात पडेल, असा अंदाज आहे. तर सकाळी आणि संध्याकाळी ढगाळ वातावरण राहिल.
2 सप्टेंबरला काय झालं?
त्याआधी साखळी फेरीतील सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने पाकिस्तानला 267 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पावसामुळे दुसऱ्या डावाचा खेळच होऊ शकला नाही.त्यामुळे मॅच रेफरी आणि पंचांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांना सामना रद्द करण्यात येत असल्याचं सांगितलं.
आशिया कप 2023 साठी भारतीय क्रिकेट संघ | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).
आशिया कप 2023 पाकिस्तान टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.