Babar Azam | बाबर आझम याचा मोठा कारनामा, महेंद्रसिंह धोनी याच्या विक्रमाची बरोबरी
पाकिस्तान कर्णधार बाबर आझम याने टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याच्या मोठ्या विक्रमची बरोबरी केली आहे. जाणून घ्या बाबरने धोनीच्या नक्की कोणता रेकॉर्डची बरोबरी केलीय.
लाहोर | एका बाजूला आयपीएल 16 व्या मोसमाचा थरार क्रिकेटप्रेमी अनुभवत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. या टी 20 मालिकेतील पहिला सामना हा शुक्रवारी 14 एप्रिल रोजी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात यजमान पाकिस्तानने न्यूझीलंडवर 88 धावांनी मात करत विजयी सलामी दिली. पाकिस्तानने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेत घेतली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या नेतृत्वात हा विजय मिळवला. बाबरने कर्णधार म्हणून हा विजय मिळवताच मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
बाबर आझम याने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. बाबरचा न्यूझीलंड विरुद्धच्या हा कर्णधार म्हणून 42 वा विजय ठरला. यासह बाबरने धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली. बाबरला आता यानंतर 2 विजयांसह कर्णधार म्हणून सर्वाधिक टी 20 सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे.
कर्णधार म्हणून सर्वाधिक टी 20 विजय
असगर अफगाण – 52 पैकी 42 विजय.
इयॉन मॉर्गन – 72 पैकी 42 विजय.
बाबर आझम – 67 पैकी 41 विजय.
महेंद्रसिंह धोनी – 72 पैकी 41 विजय.
एरॉन फिंच – 76 पैकी 40 विजय.
सामन्याचा धावता आढावा
दरम्यान पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानने सैम अयुब आणि फखर जमान या दोघांच्या प्रत्येकी 47 धावांच्या जोरावर न्यूझीलंडला विजयासासाठी 183 धावांचं आव्हान दिलं. त्यानंतर पाकिस्तानने बॅटिंगसाठी आलेल्या न्यूझीलंडला सुरुवातीपासून ठराविक अंतराने झटके द्यायला सुरुवात केली. पाकिस्तानच्या गोलंदाजाांनी न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला जास्त वेळ मैदानात टिकू दिलं नाही. पाकिस्तानने एकामागोमाग एक न्यूझीलंडला धक्के देत 15 ओव्हरमध्ये 94 धावांवर ऑलआऊट केलं.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), चॅड बोव्स, विल यंग, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, रचिन रवींद्र, अॅडम मिल्ने, मॅट हेन्री, ईश सोधी आणि बेन लिस्टर.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमान, सैम अयुब, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि जमान खान.