PAK vs SL : पाकिस्तानचा वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय, श्रीलंकेचा 6 विकेट्सने पराभव
World Cup 2023, PAK vs SL : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पाकिस्तानने सलग दुसरा विजय मिळवला आहे. श्रीलंकेविरुद्धचा सामना 6 गडी राखून जिंकला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील हा सर्वात मोठा विजय आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा हळूहळू रंगतदार वळणावर पोहोचत आहे. दुसऱ्या टप्प्यात पाकिस्तानचा सामना श्रीलंकेशी झाला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकत 50 षटकात 9 गडी गमवून 344 धावा केल्या. पाकिस्तानसमोर विजयासाठी 345 धावांचं आव्हान दिलं. इतकं मोठं आव्हान पाकिस्तानला पेलवणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला होता. पण अब्दुल्ला शफीक आणि मोहम्मद रिझवान यांच्या झंझावातापुढे श्रीलंकन गोलंदाजी फेल ठरली आहे. 345 धावा 6 गडी राखून पूर्ण केल्या आणि 10 चेंडूही शिल्लक राहिले. पाकिस्तानचा वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील हा सर्वात मोठा विजय आहे.
पाकिस्तानचा डाव
श्रीलंकेने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अडखळत झाली. इमाम उल हक आणि बाबर आझम स्वस्तात बाद झाले. पण अब्दुल्ला शफिक आणि मोहम्मद रिझवान यांनी डाव सावरला आणि द्विशतकी भागीदारी केली. अब्दुल्ला शफिक याने 103 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 113 धावा केल्या. तर मोहम्मद रिझवान याने 121 चेंडूत नाबाद 131 धावांची खेळी केली. यात 8 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
श्रीलंकेकडून कोणताही गोलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. दिलशान मदुशंकाने 2, महीश थीक्षाना आणि मथीशा पथिराना याने प्रत्येकी एक गडी बाद केला. या व्यतिरिक्त कोणत्याही गोलंदाजाला यश आलं नाही. यामुळे कुसल मेंडिस आणि समरविक्रमा यांची शतकी खेळी वाया गेली असंच म्हणावं लागेल.
अब्दुल्ला शफीक आणि मोहम्मद रिझवान यांची विजयी भागीदारी
अब्दुल्ला शफीक याने मोहम्मद रिझवान यांच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी 176 धावांची भागीदारी केली. शफीकने चौकारासह 32 व्या षटकात शतक पूर्ण केलं. हे त्याचं वनडेतील पहिलंच शतक होतं. श्रीलंकेविरुद्ध वर्ल्डकपमध्ये 36 वर्षानंतर पाकिस्तानी फलंदाजाने शतक ठोकलं. यापूर्वी 1987 मध्ये सलीम मलिक आणि जावेद मियांदाद यांनी शतक ठोकलं होतं.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शनाका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना आणि दिलशान मधुशंका.