बारकं पोरगं नाही मी..! पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम संघ सहकाऱ्यांवर भडकला
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीतून बाद होण्याची नामुष्की पाकिस्तान संघावर ओढावली आहे. त्यानंतर आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच बातम्या समोर आल्या आहेत. आता कर्णधार बाबर आझमने संघ सहकाऱ्यांना धारेवर धरलं आहे. आतापर्यंतचा सर्व राग बाबर आझमने काढला आहे.
टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेल्या पाकिस्तानचं यंदा नाक कापलं गेलं आहे. जेतेपदाच्या शर्यतीत गणला जाणाऱ्या पाकिस्तानचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं आहे. अमेरिकेसारख्या दुबळ्या संघांना सुपर ओव्हरमध्ये पराभूत केलं. तर भारताने दिलेलं 120 धावांचं सोपं आव्हान गाठता आलं नाही. दोन सामने गमावल्यानंतर सर्व काही आयर्लंड आणि अमेरिका सामन्यावर अवलंबून होतं. आयर्लंडला पराभूत केलं, पण कॅनडा विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि सर्वकाही फिस्कटलं. त्यामुळे सर्वच स्तरातून पाकिस्तानी संघ आणि बाबर आझमवर टीका होत आहे. त्यात रोज नव्या वादाला फोडणी मिळत आहे. गॅरी कर्स्टन यांनी संघावर थेट टीका करत दोन गट पडल्याचा आरोप केला होता. यानंतर हारिस रऊफ वेगळ्याच कारणाने चर्चेत आला होता. त्यानंतर पाकिस्तानी यूट्युबरने बाबर आझमवर फिक्सिंगचा आरोप कालाा. आता एका पाकिस्तानी क्रीडा पत्रकाराने दावा केला आहे की, पराभवानंतर बाबर आझमने संघ सहकाऱ्यांवर राग काढला.
पाकिस्तान टीव्ही चॅनेलच्या पत्रकाराच्या बातमीनुसार, सामन्यानंतर संघाची एक बैठक पार पडली. या बैठकीत सिलेक्टर वहाब रियाज, प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि कर्णधार बाबर आझम होता. यावेळी त्यांनी पराभवाची कारणमीमंसा केली. या बैठकीत गॅरी कर्स्टन यांनी संघातील फुटीचा मुद्दा अधोरेखित केला.या मुद्द्यानंतर बाबर आझमला राग अनावर झाला आणि त्याने खेळाडूंची तिथल्या तिथेच झाडाझडती घेतली. बाबरने सांगितलं की, मी लहान पोरगं नाही आणि माझ्या मागे काय सुरु आहे हे मला सर्व माहिती आहे. संघातील दुफळी पाहता स्पर्धेत अशी स्थिती ओढवणार हे आधीच स्पष्ट झालं होतं.
दरम्यान, पाकिस्तानच्या एका युट्यूबरने बाबर आझमवर थेट फिक्सिंगचा आरोप केला आहे. बाबरने दुबईत फ्लॅट आणि अमेरिकेत जागा त्याच पैशांनी घेतल्याचं सांगितलं आहे.इतकंच काय तर गाडी घेण्यासाठी 8 कोटी कुठून आले असा प्रश्न विचारला आहे. पण सर्व आरोपांना काहीच आधार नसल्याचं पाकिस्तानी पत्रकारांनी सांगितलं आहे. पाकिस्तानचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं असलं तरी 2026 वर्ल्डकपसाठी क्वॉलिफाय झाला आहे. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. पाकिस्तानला या स्पर्धेतलं तिकीट आयसीसी रॅकिंगच्या भरवशावर मिळालं आहे. अन्यथा पाकिस्तानला क्वॉलिफायर फेरीत खेळावं लागलं असतं.