Jasprit Bumrah vs Shaheen Afridi : पाकिस्तानचा घातक वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे बऱ्याच महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. मागच्यावर्षी जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याला दुखापत झाली होती. पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी टी 20 वर्ल्ड कपआधी दुखापतीमधून सावरला. वर्ल्ड कपमध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली. पण फायनल मॅचमध्ये त्याला पुन्हा दुखापत झाली. त्यानंतर तो अजूनपर्यंत मैदानावर पुनरागमन करु शकलेला नाही. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह सुद्धा दुखापतीचा सामना करतोय. तो सुद्धा बऱ्याच महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. दोन्ही खेळाडू मैदानावर नसले, तरी दोघांमध्ये सर्वोत्तम कोण? यावरुन मैदानाबाहेर वाद कायम आहे.
टेस्ट, वनडे आणि T20 मध्ये कोणी किती विकेट घेतल्या?
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज अब्दुल रज्जाकने या वादाला आणखी फोडणी देण्याच काम केलय. जसप्रीत बुमराह शाहीन शाह आफ्रिदीच्या जवळपासही नाहीय, असं वक्तव्य रज्जाकने केलय. बुमराहने 30 कसोटी सामन्यात 128, 72 वनडेमध्ये 121 आणि 60 टी 20 सामन्यात 70 विकेट घेतल्यात. तेच शाहीन शाह आफ्रिदीने 25 कसोटीत 99, 32 वनडेमध्ये 62 आणि 47 T20 सामन्यात 58 विकेट घेतल्या आहेत.
मुलाखतीत काय विचारलं?
एका मुलाखतीत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज अब्दुल रज्जाक दोघांपैकी सर्वोत्तम गोलंदाज कोण? असा प्रश्न विचारला. त्यावर रज्जाकने शाहीन सर्वोत्तम असल्याच सांगितलं. बुमराह शाहीनच्या जवळपासही नाही, असं रज्जाक म्हणाला. रज्जाकला नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन या तिघांपैकी एका सर्वोत्तम गोलंदाजाच नाव विचारलं. त्याने तिघेही उत्तम गोलंदाज असल्याचं सांगितलं.
बुमराह कधीपर्यंत बाहेर?
जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीचा सामना करतोय. पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीज होणार आहे. त्यावेळी पहिल्या चार पैकी 2 टेस्टमध्ये बुमराह खेळणार नाहीय. तो अजूनही पूर्णपणे फिट नाहीय. मेडीकल टीमची त्याच्यावर नजर आहे.
रोहित शर्मा काय म्हणाला?
जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबद्दल काही स्पष्ट नसल्याचं रोहित शर्माने सांगितलं होतं. पहिल्या दोन कसोटीत बुमराह खेळणार नाहीय. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यात बुमराह खेळेल, अशी अपेक्षा असल्याच रोहितने सांगितलं. “बुमराहची दुखापत पाहता आम्हाला कुठलाही धोका पत्करायचा नाहीय. पाठीची दुखापत गंभीर असते. आम्हाला बरच क्रिकेट खेळायच आहे” असं रोहित म्हणाला.