पाकिस्तानची कसोटी क्रिकेटमध्ये दैना, Live शोमध्ये शोएब अख्तर भडकला आणि म्हणाला…
पाकिस्तानची कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात दैना झाली आहे. देशात खेळलेल्या कसोटी मालिकांमध्येही पराभवाचं तोंड पाहावं लागत आहे. त्यामुळे माजी क्रिकेटपटूंचा संताप झाला आहे. जगभरात पाकिस्तान क्रिकेटची नाचक्की झाली आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने पाकिस्तान संघावर आगपाखड केली आहे.

पाकिस्तानचं कसोटी क्रिकेटमध्ये काही खरं नाही असंच दिसत आहे. एकापाठोपाठ एक पाकिस्तानची पराभवाची मालिका सुरु आहे. सर्वात वाईट म्हणजे दुबळ्या समजल्या जाणाऱ्या बांग्लादेश संघाने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत व्हाईटवॉश दिला. त्यानंतर इंग्लंडने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. पाटा विकेटवर खरं तर पहिल्या दोन दिवसात सर्वकाही पाकिस्तानच्या बाजूने होतं. मात्र त्यानंतर सर्वकाही रुळावरून घसरलं. पहिल्या डावात 500 हून अधिक धावा करूनही पाकिस्तानला एक डाव आणि 47 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या जो रूट आणि हॅरी ब्रूकने 454 धावांची मोठी भागीदारी केली. त्यामुळे इंग्लंडला 7 गडी गमवून 823 धावांपर्यंत मजल मारता आली. 267 धावांची आघाडी मोडताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 220 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे पाकिस्तान संघाची संपूर्ण जगात नाचक्की झाली आहे. पाकिस्तानच्या अशा लाजिरवाण्या पराभवानंतर माजी दिग्गज खेळाडूंनी संयम सोडला आहे. लाईव्ह टीव्ही शोमध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तान संघाला खडेबोल सुनावले आहेत.
माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने पीटीव्ही स्पोर्ट्सवरील लाईव्ह चर्चेत सांगितलं की, ‘जे काही पेरणार तेच उगवणार आहे. मागच्या दशकात मी क्रिकेटमध्ये खालचा स्तर पाहिला आहे. खूपच निराशाजनक स्थिती आहे. पराभव होणं ठीक आहे, पण सामना कुठेतरी जवळ असायला हवा. पण मागच्या दोन दिवसात आम्ही जे काही पाहिलं त्यामुळे सर्व आशा संपुष्टात आल्या आहेत. यावरून आम्ही चांगलं खेळत नसल्याचं दिसत आहे. इंग्लंडने 800 पेक्षा जास्त धावा केल्या आणि बांगलादेशने आम्हाला पराभूत केलं.’
‘पाकिस्तानचे क्रीडाप्रेमी सांगत आहेत की, कसोटी क्रिकेट खेळणं बंद करा. मी काही प्रतिक्रिया पाहिल्या. आयसीसी विचार करत असेल की, आम्ही पाकिस्तानात टीम पाठवायची का? आणि पाकिस्तानचा कसोटी दर्जा कायम ठेवायचा का? सर्व काही निराशाजनक आहे. यामुळे पाकिस्तान क्रिकेट, चाहते आणि नवोदित खेळाडूंचं नुकसान होत आहे. मी पीसीबीला सांगू इच्छितो की, जे काही सुरू आहे ते व्यवस्थित करा.’, असंही शोएब अख्तरने पुढे सांगितलं.