चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानने गुपचूपपणे सोपवला संघ, भारताला धक्का देणाऱ्या खेळाडूचं कमबॅक
भारत पाकिस्तान वगळता इतर सहा संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघांची घोषणा केली आहे. पाकिस्तानने गुपचूपपणे संघाची प्रायमरी यादी आयसीसीकडे सोपवली आहे. विशेष म्हणजे 459 दिवसानंतर एका दिग्गज खेळाडूची संघात एन्ट्री झाली आहे. याच खेळाडूने चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये टीम इंडियाला जखम दिली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया जाहीर करण्यात दिरंगाई होत असताना पाकिस्तानने गुपचूपपणे एक डाव टाकला आहे. पाकिस्तानचा पहिला सामना न्यूझीलंडशी 19 फेब्रुवारीला होणार आहे. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्रोव्हिजनल टीम लिस्ट आयसीसीकडे सुपूर्द केली आहे. टीमममध्ये बाबर आझम, शाहीन आफ्रिदी यांच्यासह नसीम शाह आणि हारिस रुउफला संधी दिली आहे. दरम्यान, या टीममध्ये फखर जमानची एन्ट्री झाली आहे. फखर जमान आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डात बरंच काही वाजलं होत. त्यामुळे त्याने पाकिस्तानशी शेवटचा वनडे सामना नोव्हेंबर 2023 मध्ये खेळला होता. तेव्हापासून त्याला वनडे संघात स्थान मिळालं नव्हतं. पण अखेर त्याला संघात स्थान देत भारताची जखम ओली केली आहे. कारण याच फखर जमानने भारताला 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीत पराभवाची धूळ चारण्यास महत्त्वाची भूमिका बजावली होती. 459 दिवसानंतर फखर जमानला संघात स्थान दिल्याने टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 2017 च्या अंतिम फेरीत फखर जमानने शतकी खेळी करत टीम इंडियाला पराभवाच्या दरीत ढकललं होतं.
2017 चॅम्पियन्स ट्रॉफीत फखर जमानने 106 चेंडूत 12 चौकार आणि तीन षटकाराच्या मदतीने 114 धावा केल्या. तसेच भारतासमोर विजयासाठी 338 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान काही भारताला गाठता आलं नव्हतं. भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 158 धावांवर बाद झाला. पाकिस्तानने भारताला 180 धावांनी पराभूत केलं होतं. फखर जमान या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.
दरम्यान, मधल्या फळीत तय्यब ताहिर, इरफान खान नियाजी, उस्मान खान, कामरान गुलाम आणि सलमान अली यासारख्या खेळाडूंची नावं आहेत. या खेळाडूंनी दक्षिण अफ्रिकेत चांगली कामगिरी केली होती. गोलंदाजीसाठी अबरार अहमद आणि सूफियान मुकीम यांना संधी दिली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा प्रायमरी संघ : मोहम्मद रिजवान (कर्णधार) (विकेटकीपर), बाबर आजम, सईम अयूब, तय्यब ताहिर, इरफान खान नियाजी, सुफियान मुकीम, मोहम्मद हसनैन, अब्दुल्ला शफीक, नसीम शाह, उस्मान खान, शाहीन आफ्रिदी, हारिस रऊफ, अबरार अहमद, कामरान गुलाम, सलमान अली आगा, इमाम-उल-हक, फखर जमान, हसीबुल्लाह आणि अब्बास आफ्रिदी.