बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघ जाहीर, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अशी होईल उलथापालथ
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या दृष्टीने प्रत्येक कसोटी मालिकेला महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण सामन्याच्या निकालानंतर विजयी टक्केवारीत उलथापालथ पाहायला मिळते. पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आहे. यासाठी बांगलादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे.
पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 21 ऑगस्टपासून सुरु होत आहे. पहिला सामना 21 ऑगस्टला रावलपिंडी येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा सामना 30 ऑगस्टला कराची येथे खेळवला जाणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तान शाहीन आणि बांग्लादेश ए यांच्यात चार एकदिवशीस सामने खेळले जाणार आहे. सध्या या सामन्यांसाठीचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. 17 ऑगस्टला बांगलादेशचा संघ दोन कसोटी सामन्यांसाठी पाकिस्तानत येणार आहे. असं असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 17 सदस्यांची कसोटी मालिकेसाठी घोषणा केली आहे. शान मसूद पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार आहे. तर सउद शकीलकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या कामरान गुलाम, मोहम्मद अली आणि मोहम्मद हुरैराला यांना कसोटी संघात स्थान दिलं गेलं आहे.
पाकिस्तान कसोटी संघाचा ट्रेनिंग कॅम्प रावलपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये 11 ऑगस्टपासून आहे. ही कसोटी मालिका जेसन गिलेस्पीच्या देखरेखीत होणार आहे. तसेच सहाय्यक प्रशिक्षक अझहर महमूदही संघासोबत असणार आहे. दरम्यान, शाहीन आफ्रिदी आणि सऊद शकील यांच्यात उपकर्णधारपदासाठी चढाओढ होती. कोणच्या गळ्यात माळ पडणार याची उत्सुकता होती. अखेर सऊद शकीलने बाजी मारली. दुसरीकडे, बांग्लादेश संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार की नाही याबाबतही साशंकता आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तानची विजयी टक्केवारी ही 36.54 टक्के आहे. तर बांगलादेशचा संघ आठव्या स्थानावर असून विजयी टक्केवारी ही 25 टक्के आहे. या मालिकेत पाकिस्तानने बांगलादेशला व्हाईट वॉश दिला तर तिसऱ्या स्थानावर मजल मारू शकतो. दरम्यान, न्यूझीलंड आणि श्रीलंका विजयी टक्केवारी 50 सह तिसऱ्या स्थानावर आहेत.
पाकिस्तानचा कसोटी संघ : शान मसूद (कर्णधार), सउद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, कामरान गुलाम, खुर्रम शाहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), नसीम शाह, सइम अयूब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (विकेटकीपर), शाहीन आफ्रिदी.