चंदीगड : आयपीएलचा मोसम संपल्यानंतर टीम इंडियाचा आंतरराष्ट्रीय सीजन सुरु होईल. टीम इंडियाकडे सध्या बॅटिंग, बॉलिंगमध्ये बॅलन्स आहे. प्रश्न फक्त विकेटकिपिंगचा आहे. मागच्यावर्षाच्या अखेरीस ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला. ऋषभ अजून पुढते काही महिने क्रिकेट खेळू शकणार नाहीय. टीम इंडियाने ऋषभच्या जागी वेगवेगळे पर्याय चाचपून पाहिले. पण अजून त्यांचा शोध संपलेला नाही.
ऋषभ सारखीच आक्रमक बॅटिंग करणारा इशान किशन फ्लॉप आहे. केएल राहुलकडे विकेटकिपिंगची जबाबदारी देऊन पाहिली. पण बॅटिंगमध्ये त्याचा फॉर्म हरवलाय. आता त्याला दुखापत सुद्धा झालीय. तो कधीपर्यंत बरा होईल, हे सांगता येत नाही.
ऋषभ पंतची जागा घेण्यासाठी एक नाव दिसतय
केएस भरतला ऑस्ट्रेलियाच विरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी दिली. पण त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. यंदा वनडे वर्ल्ड कप भारतात आहे. ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप टुर्नामेंटला सुरुवात होईल. त्यावेळी ऋषभ पंतची जागा कोण घेणार? हा मुख्य प्रश्न आहे. चालू आयपीएल सीजनमध्ये ऋषभ पंतची जागा घेण्यासाठी एक नाव दिसतय.
कोच वसीम जाफर काय म्हणाले?
आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये त्याने आपल्या बॅटिंगने प्रभावित केलय. ऋषभची जागा घेऊ शकणाऱ्या या फलंदाजाच नाव आहे, जितेश शर्मा. त्याने आपल्या आक्रमक बॅटिंगने प्रभावित केलय. टीम इंडियाच प्रतिनिधीत्व करण्यासाठी जितेश शर्मा सज्ज आहे, असं कोच वसीम जाफर म्हणाले. जितेश शर्मा पंजाब किंग्सकडून खेळतो.
विदर्भाच्या मुलाने संधीचा फायदा उचलला
29 वर्षाचा जितेश शर्मा विदर्भाचा खेळाडू आहे. मागच्यावर्षी पंजाब किंग्सन त्याला फक्त 20 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. त्याला चालू सीजनमध्ये टीमचा मुख्य विकेटकीपर फलंदाज जॉनी बेयरस्टो नसल्याने संधी मिळाली. जितेशने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत चांगलं प्रदर्शन केलं.
मागच्यावर्षी सुद्धा चांगलं प्रदर्शन
“मागच्यावर्षी सुद्धा जितेशने चांगलं प्रदर्शन केलं होतं. मला वाटतं, आता त्याच्या खेळात अजून सुधारणा झालीय. बॅटिंगमध्ये सुधारणा झालीय. तो आधीपासूनच एक चांगला विकेटकीपर आहे” असं वसीम जाफर केकेआर विरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाले.
जितेश शर्माने मुंबई विरुद्ध 27 चेंडूत नाबाद 49 धावा फटकावल्या व आपली प्रतिभा दाखवून दिली. यावर्षी श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्ध टी 20 आंतरराष्ट्रीय सीरीजसाठी त्याचा टीममध्ये समावेश केला होता. पण डेब्युची संधी मिळाली नाही.