पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचं तिकीट फक्त 15 रुपये, या कारणामुळे घेतला निर्णय
पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात 21 ऑगस्टपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी पीसीबीने तिकीटाचे दर जाहीर केले आहेत. या सामन्यासाठी दिवसाच्या तिकीटाची किंमत फक्त 15 रुपये असणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेतल्या साखळी फेरीतील महत्त्वाची मालिका पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात होत आहे. ही मालिका पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी या मालिकेचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 21 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. पण या मालिकेपूर्वी पीसीबीला वेगळीच चिंता सतावत आहे. गेल्या वर्षभरापासून मायदेशात पाकिस्तानचा सामना पाहणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी मैदानात येऊन सामना पाहावा यासाठी पीसीबी प्रयत्नशील आहे. यासाठी पीसीबीने कसोटी सामन्यांच्या तिकीटाचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अवघ्या 15 रुपयात प्रेक्षकांना हा सामना स्टेडियममधून पाहता येणार आहे. कराची येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी तिकीटांचे दर जाहीर करण्यात आले आहेत. या सामन्याचं तिकीट 50 पीकेआर म्हणजे 15 रुपये आहे.
पाकिस्तान सुपर लीग 2024 स्पर्धेकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. बाद फेरी आणि अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकच आले नव्हते. त्यामुळे सोशल मीडियावर बरंच रणकंदन माजलं होतं. इतकंच काय पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचं हासं झालं होतं. आशिया कप स्पर्धेतही अशीच काहिशी स्थिती होती. त्यामुळे कसोटी सामना पाहण्यासाठी प्रेक्षक येणारच नाहीत याची भीती पीसीबीला आहे. त्यामुळे या स्थितीवर मात करण्यासाठी फक्त 15 रुपये तिकीट दर ठेवण्यात आला आहे. आता खरंच ही युक्ती कामी येते का? आणि प्रेक्षकवर्ग मैदानात येतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दोन्ही संघाचे खेळाडू
पाकिस्तान कसोटी संघ: शॉन मसूद (कर्णधार), सउद शकील (उपकर्णधार), अमीर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नसीम शाह, सैम अयुब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (यष्टीरक्षक), शाहीन आफ्रिदी.
बांगलादेश कसोटी संघ: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोहम्मद हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन कुमार दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, शरीफुल इस्लाम , हसन महमूद, हसन तस्किन अहमद आणि सय्यद खालिद अहमद.