Pakistan | पाकिस्तानचा टीम इंडिया विरुद्धच्या सामन्याआधी मोठा निर्णय
Pakistan | टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धीत येत्या 2 महिन्यात क्रिकेटच्या मैदानात आमनेसामने भिडणार आहेत.
मुंबई | आशिया कप 2023 मध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. आशिया कपला 31 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानकडे आशिया कपचं यजमानपद आहे. टीम इंडिया आशिया कप स्पर्धेतील सुरुवात 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. त्याआधी पाकिस्तानने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या माजी कर्णधारांवर आशिया आणि वर्ल्ड कपआधी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
मोहम्मद हाफीज, मिस्बाह उल हक आणि इंझमाम उल हक या तिघांची हाय प्रोफाईल टेक्निकल कमेटीत समावेश करण्यात आला आहे. मिस्बाह, इंझमाम आणि मोहम्मद या तिघांवर पाकिस्तान क्रिकेट टीमची भिस्त असणार आहे. या तिघांवर पाकिस्तान क्रिकेट टीमच्या आगामी मालिकांचं आयोजन, निवड समितीची नियुक्ती, या आणि अशा विविध जबाबदारी असणार आहे.
पीसीबी अध्यक्ष जका अश्रफ काय म्हणाले?
“पाकिस्तान क्रिकेटच्या उज्वल भविष्यासाठी टीममध्ये इंझमाम उल हक, मिस्बाह उल हक आणि मोहम्मद हाफीझ या तिघांचं स्वागत करताना मला आनंद होत आहे. या तिन्ही माजी कर्णधारांना क्रिकेटबद्दल चांगली माहिती आणि ज्ञानही आहे. तसेच त्यांना आधुनिक क्रिकेटमध्ये काय हवं काय नको, याची चांगली जाण आहे”, असं जका अश्रफ म्हणाले.
मिस्बाह उल हकची क्रिकेट कारकीर्द
मिस्बाह उल हक हा पाकिस्ताचा सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक होता. मिस्बाहच्या नेतृत्वात पाकिस्तानने 56 पैकी 26 कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला. इतकंच नाही, पाकिस्तान मिस्बाहच्या नेतृत्वातचं आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये नंबर 1 झाली होती. मिस्बाहने पाकिस्तानचं 75 कसोटी, 162 वनडे आणि 39 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं.
इंझमाम उल हक
पाकिस्तानने 1992 मध्ये वर्ल्ड कप जिंकला. इंझमाम उल हक त्या टीमचा भाग होता. इंझमामने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत पाकिस्तानचं नेतृत्वही केलं. इंझमामने पाकिस्तानकडून सर्वाधिक वनडे रन्स करण्याचा विक्रम केला. इंझमामच्या नावावर 378 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11 हजार 739 धावांची नोंद आहे. इंझमामने या दरम्यान10 शतकं आणि 83 अर्धशतकं ठोकली आहेत.