‘त्या’ कृतीप्रकरणी हरभजन, युवराज आणि सुरेश रैना यांची अडचण वाढली, आता झालं असं की…
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2024 स्पर्धेतील विजयानंतर तयार केलेला व्हिडीओ युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांच्या अंगलट आला आहे. सोशल मीडियावर रान उठल्यानंतर हरभजन सिंगने माफीनामा मागितला. पण प्रकरण काही शांत होण्याचं नाव घेत नाही. आता हे प्रकरण पोलिसात गेलं आहे.
13 जुलैला टीम इंडियाने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंट्स स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केलं. जेतेपदावर नाव कोरल्यानंतर माजी क्रिकेटपटूंनी केलेली कृती अंगलट आली आहे. हरभजन सिंग, सुरेश रैना, गुरकीरत मान आणि युवराज सिंग यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. हरभजन सिंगने एक व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंटवर टाकला होता. या व्हिडीओतून दिव्यांग व्यक्तींचा अपमान झाल्याचं पाहून माजी क्रिकेटपटू नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले. हे प्रकरण वाढत असल्याचं पाहून माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग पुढे आला आणि माफी मागितली. या माध्यमातून कोणाला दुखवण्याचा हेतू नव्हता असं स्पष्ट केलं आहे. नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपल (NCPEDP) चे कार्यकारी संचालक अरमान अली यांनी अमर कॉलनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याचं वृत्त पीटीआयने दिले आहे. या तक्रारीत क्रिकेटपटूंसोबत मेटा इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचाही उल्लेख आहे. अशा पोस्टला परवानगी देऊन माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चं उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
अमर कॉलनी पोलिसात तक्रार दाखल झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. आता हे प्रकरण पुढे सायबर सेलकडे वर्ग केलं जाणार आहे. व्हिडीओमध्ये हरभजन सिंग, युवराज सिंग आणि सुरेश रैना यांनी विशिष्ट कृती करून दिव्यांगजनांचा अपमान केल्याची भावना आहे. नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपल मते, क्रिकेटपटूंनी जाणीवपूर्वक हा व्हिडीओ करून दिव्यांगांचा अपमान केला आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
हरभजन सिंगने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात सलग 15 दिवस क्रिकेट खेळून शरीराची स्थिती नाजूक झाल्याचं सांगितलं. या व्हिडीओमागे तौबा-तौबा हे गाणंही लावलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. पण त्या व्हिडीओ तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यामुळे हरभजन सिंगने हा व्हिडीओ सोशल मीडियावरून डिलिट केला आणि माफी मागितली. दुसरीकडे, प्रकरण वाढत असल्याचं पाहून सुरेश रैनाने देखील माफी मागितली आहे. आता हे प्रकरणे पुढे कसं वळण घेतं याकडे लक्ष लागून आहे.