IND vs NZ : टीम इंडियाची स्तुती करत केन विल्यमसनने दिलं आव्हान, उपांत्य फेरीपूर्वी स्पष्टच म्हणाला की…
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आहेत. अवघ्या काही तासात हा सामना सुरु होईल. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. 2019 साली न्यूझीलंडने भारताचा मार्ग अडवला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी क्रीडाप्रेमी प्रार्थना करत आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यानेही स्तुती करता करता गर्भित इशारा दिला आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदासाठी कायमच फेव्हरेट मानलं जातं. पण 1983 नंतर थेट 2011 जेतेपदासाठी उजडावं लागलं. त्यामुळे भारतीय संघ जेतेपदाच्या शर्यतीत कसा बाहेर पडतो हे क्रीडाप्रेमींना माहिती आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत तसं काही होऊ नये यासाठी क्रीडाप्रेमी प्रार्थना करत आहेत. दुसरीकडे, न्यूझीलंडने आयसीसी स्पर्धांमध्ये कायमच भारताचा मार्ग अडवला आहे. त्यामुळे ही भीती आणखी बळावली आहे. 2019 वनडे वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत याची प्रचिती आली आहे. पण आता सामना भारतीय धरतीवर होणार असल्याने टीम इंडियाकडे विजयाची संधी अधिक आहे. पण न्यूझीलंडला कमी लेखून चालणार आहे. साखळी फेरीतही काही मोठ्या फरकाने विजय मिळाला असं नाही. 274 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची चांगलीच दमछाक झाली. आता उपांत्य फेरीबाबत केन विल्यमसनने मोठं वक्तव्य केलं आहे.
केन विल्यमसन याने पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘तुम्ही लोकं अंडरडॉग लिहिता आणि यात जास्त काही बदल झाला नाही. मला यात काहीच त्रास वाटत नाही. भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघ निश्चितच सर्वोत्कृष्ट संघ आहे. पण आमचा दिवस असला की आम्ही कोणालाही पराभूत करण्याची क्षमता ठेवतो.’
‘प्रत्येक संघाची एक बांधणी असते. हार्दिकच्या दुखापतीमुळे भारतीय संघाचं तालमेल बिघडला आहे. पण सामन्यावर तसा काही फरक पडला नाही. भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. आमच्या संघाने पण अशी कामगिरी केली आहे. भारतीय संघाने इतर संघांच्या तुलनेत महत्त्वाचा खेळाडू नसतानाही चांगली कामगिरी केली आहे.’,असं केन विल्यमसन पुढे म्हणाला.
दोन्ही संघाचे खेळाडू
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, इशान किशन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), मार्क चॅपमॅन, विल यंग, डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र, डेवॉन कॉनव्हे, टॉम ब्लंडेल, टॉम लॅथम, ईश सोढी, कायल जेमिसन, लोकी फर्ग्यसन, टिम साऊथी, ट्रेंट बोल्ट