Video | तेवढं मन मोठं लागतं! अफगाणिस्तानच्या ‘या’ खेळाडूने दिवाळीसाठी गरिबांना वाटले पैसे, व्हिडीओ तुफान व्हायरल
भारतामध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून वर्ल्ड कपसुद्धा सुरू आहे. आता सेमी फायनलपर्यंत स्पर्धा गेली असताना वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेल्या अफगाणिस्तान संघाच्या खेळाडूने गरिबांना पैसे देत सर्वांची मनं जिंकली आहेत.
मुंबई : वर्ल्ड कप 2023मधील चार संघ आता निश्चित झाले आहेत. भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ ट्रॉफीसाठी एकमेकांना भिडणार आहेत. सर्व संघ आता घरच्या वाटेला लागले आहेत. मात्र जाता जाता अफगाणिस्तान संघाच्या एका खेळाडूने सर्वांची मनं जिंकली आहेत. दिवाळी सणाच्या निमित्ताने रस्त्यावर झोपलेल्या गरिबांना त्याने झोपेत असताना पैसे वाटले. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
कोण आहे तो खेळाडू?
अफगाणिस्तान संघाने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी केली. सेमी फायनलमध्ये जागी पक्की करण्यापासून काहीच पाऊलं दूर राहिला. वर्ल्ड कपमध्ये आपल्या प्रदर्शनाने त्यांचं सर्व क्रिकेट जगतातून कौतुक होत आहे. भारतामध्येही अफगाणिस्तान संघाला चांगला सपोर्ट आहे, आता तो आणखी वाढणार असल्याचं दिसतंय. अफगाणिस्तान संघाचा फलंदाज रहमानउल्ला गुरबाज याने मोठं मन दाखवत गरिबांना मदत केली आहे.
पाहा व्हिडीओ
Rahmanullah Gurbaz silently gave money to the needy people on the streets of Ahmedabad so they could celebrate Diwali.
– A beautiful gesture by Gurbaz. pic.twitter.com/6HY1TqjHg4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 12, 2023
व्हायरल व्हिडीओमझध्ये रहमानउल्ला गुरबाज हा रात्री 3 वाजता रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गरिबांकडे पैसे ठेवताना दिसत आहे. अहमदाबादच्या एका रेडिओ जॉकीचा आवाज आपल्याला ऐकू येत आहे. भारतात इतके संघ आले असताना त्यामधील रहमानउल्ला याने केलेल्या या कृतीमुळे भारतीय क्रिकेट चाहते त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तान संघ सेमी फायनलमध्ये जागा पक्की करू शकला नसला तरी त्यांनी भारतीयांच्या मनात मात्र आपली जागा पक्की केली आहे.
दरम्यान, आज भारत आणि नेदरलँडमध्ये वर्ल्ड कपमधील शेवटचा सामना होणार आहे. त्यानंतर पहिला सेमी फायनल सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये १५ नोव्हेंबरला, तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा सेमी फायनल सामना १६ नोव्हेंबरला पार पडणार आहे.