MUM vs BRD : तनुष कोटीयनचा ‘पंच’, बडोदाविरुद्ध मुंबईच सुपर कमबॅक, विजयासाठी 262 धावांचं आव्हान
Baroda vs Mumba Ranji Trophy: मुंबईने बडोदाला दुसऱ्या डावात 185 धावांवर रोखलं. बडोदाकडे पहिल्या डावात 76 धावांची आघाडी होती. त्यामुळे मुंबईला विजयासाठी 262 धावांचं आव्हान मिळालं आहे.
गतविजेत्या मुंबईने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात बडोदा विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात तिसऱ्या दिवशी जोरदार कमबॅक केलं आहे. बडोद्याने पहिल्या डावात 290 धावा केल्यानंतर मुंबईला 214 धावांवर रोखलं. त्यामुळे बडोद्याला पहिल्या डावात 76 धावांची निर्णायक आघाडी मिळाली. बडोद्याला या आघाडीसह दुसऱ्या मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी बडोद्याला 190 धावांच्या आत रोखलं. मुंबईने बडोदाला 60.3 ओव्हरमध्ये 185 धावावंर ऑलआऊट केलं. त्यामुळे मुंबईला विजयासाठी 262 धावांचं आव्हान मिळालं आहे.
बडोदाचा दुसरा डाव आणि तनुष कोटीयनचा ‘पंच’
बडोदाकडून दुसऱ्या डावात फक्त पाच जणांनाच दुहेरी आकडा गाठता आला. कॅप्टन कृणाल पंड्या याने सर्वाधिक 55 धावांचं योगदान दिलं. महेश पीठीया याने 40 धावा केल्या. अतित शेठ याने 26 आणि शिवालिक शर्माने 13 धावांचं योगदान दिलं. तर ज्योत्सनिलने 10 धावा केल्या. तर इतरांनी मुंबईच्या गोलंदाजंसमोर गुडघे टेकले. मुंबईकडून तनुष कोटीयनने 21 ओव्हरमध्ये 61 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. हिमांशु सिंहने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर शार्दूल ठाकुर आणि मोहित अवस्थी या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट सहकाऱ्यांना अप्रतिम साथ दिली.
दरम्यान त्याआधी मुंबईने बडोदाच्या 290 धावांच्या प्रत्युत्तरात 214 धावा केल्या. मुंबईकडून पहिल्या डावात आयुष म्हात्रे याने सर्वाधिक 52 धावा केल्या. हार्दिक तामोरे याने 40, कॅप्टन अजिंक्य रहाणे 29, शार्दूल ठाकुर 27, शम्स मुलानी 16 आणि मोहित अवस्थीने 14 धावांचं योगदान दिलं. सिद्धेश लाड याने 8 आणि पृथ्वी शॉने 7 आणि तनुष कोटीयनने 1 धाव केली. तर श्रेयस अय्यरला भोपळाही फोडता आला नाही. बडोदाकडून भार्गव भट्ट याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. अभिमन्यू सिंह याने तिघांना बाद केलं. महेश पीठीयाने 2 विकेट्स मिळवल्या. तर कॅप्टन कृणाल पंड्याने 1 विकेट घेतली.
बडोदा प्लेइंग ईलेव्हन : क्रुणाल पंड्या (कर्णधार), ज्योत्स्निल सिंग, शिवालिक शर्मा, शाश्वत रावत, विष्णू सोलंकी, मितेश पटेल (विकेटकीपर), राज लिंबानी, महेश पीठिया, अतित शेठ, अभिमन्यू सिंग राजपूत आणि भार्गव भट्ट
मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, सिद्धेश लाड, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलानी, तनुष कोटियन, शार्दूल ठाकुर, मोहित अवस्थी आणि हिमांशू वीर सिंग.