Virat Kohli : कोहलीचा ‘विराट’ निर्णय;चाहत्यांनाही वाटेल अभिमान!
Cricket : टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे. मात्र त्याआधी विराटची चर्चा रंगली आहे.
![Virat Kohli : कोहलीचा 'विराट' निर्णय;चाहत्यांनाही वाटेल अभिमान! Virat Kohli : कोहलीचा 'विराट' निर्णय;चाहत्यांनाही वाटेल अभिमान!](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/virat-kohli-2.jpg?w=1280)
बॉर्डर गावसकर ट्रॉफीत अपयशी ठरल्यानंतर आता टीम इंडियाचे खेळाडू देशांतर्गत क्रिकेटकडे पुन्हा एकदा वळले आहेत. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे दोघे काही दिवसांपूर्वी मुंबईसाठी खेळेले. त्यानंतर आता 30 जानेवारीपासून रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहे. त्यापैकी दिल्ली विरुद्ध रेल्वे या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे विराट कोहली. टीम इंडियाचा हा अनुभवी फलंदाज दिल्लीकडून खेळणार आहे. विराटचं अनेक वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमबॅक होत आहे. विराटला घरच्या टीमकडून खेळताना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सूक आहेत. मात्र त्याआधी विराटच्या एका निर्णयाची एकच चर्चा रंगली आहे.
विराट कोहली जवळपास 13 वर्षांनंतर रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळणार आहे. फक्त नि फक्त विराट खेळणार असल्याने सामना लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. यावरुन विराटची क्रेझ काय आहे, याचा अंदाज बांधता येईल. मीडिया रिपोर्ट्नुसार, विराटने या सामन्यात खेळण्यासाठी मिळणाऱ्या मानधनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
विराटचा निर्णय काय?
मीडिया रिपोर्टनुसार, विराट रेल्वे विरूद्धच्या सामन्यासाठी मिळणार मानधन घेणार नाही. विराट मानधन आणि थोडी फार रक्कम दिल्लीच्या ग्राउंड्समॅनला देणार असल्याचं म्हटलं जात आहे. रणजी सामन्यात खेळण्यासाठी मिळणारी रक्कम ही विराटसाठी फार मोठी राशी नसेलही, मात्र इतर खेळाडू आणि ग्राउंड्समॅनसाठी त्याची किंमत जास्त आहे. रणजीच्या 20-40 सामने खेळलेल्या खेळाडूला एका दिवसासाठी 50 हजार रुपये मिळतात. विराटने आतापर्यंत 23 सामने खेळले आहेत. त्यामुळे विराटला 2 लाख रुपये मिळतील.
तसेच विराटला बीसीसीआयकडून करारानुसार, एका वर्षाचे 7 कोटी मिळतात. तसेच बीसीसीआय एका कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये देते.
सामना कुठे?
दरम्यान दिल्ली विरुद्ध रेल्वे यांच्यातील सामना हा अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना क्रिकेट चाहत्यांना मोफत पाहायला मिळणार आहे. मात्र त्यासाठी स्टेडियममध्ये जाताना सोबत आधार कार्ड ठेवणं बंधनकारक आहे. तसेच स्टेडियममध्ये चाहत्यांसाठी पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
रणजी ट्रॉफीसाठी दिल्ली क्रिकेट टीम : आयुष बदोनी (कॅप्टन), विराट कोहली, प्रणव राजवंशी (विकेटकीपर), सनत सांगवान, अर्पित राणा, मयंक गुसाई, शिवम शर्मा, सुमित माथुर, वंश बेदी (विकेटकीपर), मनी ग्रेवाल, हर्ष त्यागी, सिद्धांत शर्मा, नवदीप सैनी, यश धुळ , गगन वत्स, जोंटी सिद्धू, हिम्मत सिंह, वैभव कांडपाल, राहुल गहलोत आणि जितेश सिंह.