Ranji Trophy : पराभवानंतर विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने सांगितलं नेमकं कुठे चुकलं? स्पष्टच म्हणाला..
रणजी ट्रॉफी स्पर्धेत पुन्हा एकदा मुंबई दबदबा दिसून आला. रणजी स्पर्धेच्या इतिहासात 42व्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. मुंबईने अंतिम फेरीत विदर्भाचा 169 धावांनी पराभव केला आणि जेतेपद मिळवलं. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने झुंजार खेळी केली पण सर्वकाही व्यर्थ केलं. अखेर सामन्यानंतर त्याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
मुंबई : रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबई आणि विदर्भ हे दोन आमनेसामने आले होते. नाणेफेकीचा कौल विदर्भाच्या बाजूने लागला. यानंतर मुंबईला 224 धावांवर रोखण्यात विदर्भाला यश आलं. त्यामुळे पहिल्याच दिवशी मुंबईचा संघ बॅकफूटवर होता. पण सहज नांगी टाकेल असा काही मुंबईचा संघ नाही. विदर्भाला पहिल्याच डावात बॅकफूटला ढकलण्यात यश मिळवलं. अवघ्या 105 धावांवर विदर्भाचा धुव्वा उडवला आणि पहिल्या डावात 119 धावांची आघाडी घेतली. या आघाडीसह दुसऱ्या डावात मुंबईने 418 धावा केल्या आणि 537 धावा विजयासाठी दिल्या. या धावांचा पाठलाग करताना विदर्भाने कोणतीच कसर सोडली नाही. करुण नायर, अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे यांनी झुंजार खेळी केली. त्यामुळे मुंबईचं टेन्शन वाढतच होतं. पण तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे यांनी मोक्याच्या क्षणी विकेट घेतले आणि विदर्भाला पराभवाच्या दरीत ढकललं. या सामन्यानंतर विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकर याने चुकांचा पाढा वाचला.
“पहिल्या डावात आम्ही खूप खराब खेळलो. मुंबईला कमी धावांवर रोखण्यात अपयश आलं. तसेच पहिल्या डावात आमची फलंदाजी ढासळली. त्याचा फटका आम्हाला नंतर बसला. त्यामुळे अंतिम सामन्यात आमच्या पराभवाची नामुष्की ओढावली. मुंबईने खरंच चांगली गोलंदाजी केली. तसं पाहिलं तर या खेळपट्टीवर फलंदाजी करणंही कठीण होतं. पण मुंबईच्या फलंदाजांनी चिकाटीने धावा केल्या.” असं विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकर याने सांगितलं.
“आम्हाला काही संधी चालून आल्या होत्या. पण त्याचं संधीत रुपांतर करण्यात आलं नाही. मुशीर खानला धावचीत करणं असो, की अजिंक्य रहाणेचं पायचीत होणं असो. अजिंक्य आणि मुशीरच्या पार्टनरशिपमुळे आम्ही सामन्यापासून लांब गेलो. त्यानंतर श्रेयस आला आणि त्याने झटपट धावा करून गेला.” असंही अक्षय वाडकर याने पुढे सांगितलं.
“आम्हाला फक्त ते बॉल टू बॉल खेळायचे होते आणि संपूर्ण बचाव करून त्यांना बुचकळ्यात पाडायचं होतं. हताश केलं तरच चुका करतील आणि त्याचा फायदा होईल अशी रणनिती होती. भागीदारी ही शेवटची मुख्य भागीदारी आहे असे आम्हाला वाटले. कारण नंतरचे फलंदाज बचाव करू शकतात, परंतु धावा काढणे कठीण असेल हे जाणून होतो.”, असंही अक्षय वाडकर पुढे म्हणाला.