Ranji Trophy : श्रेयस अय्यर याला अखेर सूर गवसला, महाराष्ट्र विरुद्ध शतकी खेळी
Shreyas Iyer Century Ranji Trophy : श्रेयस अय्यरला गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने मोठी खेळीचं शतकात रुपांतर करण्यात अपयश होतं. मात्र अखेर मुंबईकर फलंदाजाला सूर गवसला आणि त्याने शतक ठोकलंय.
टीम इंडियातून बाहेर असलेला युवा फलंदाज श्रेयस अय्यर याला अखेर सुर गवसला आहे. श्रेयसने रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकडून महाराष्ट्र विरुद्ध धमाकेदार शतक ठोकत कमबक केलं आहे. श्रेयसने सामन्यातील दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत विस्फोटक फटकेबाजीसह हा शेकडा पूर्ण केला. श्रेयस कॅप्टन अजिंक्य रहाणे आऊट झाल्यानंतर पाचव्या स्थानी बॅटिंगसाठी आला. श्रेयसने युवा आयुष म्हात्रेला साथ देत मुंबईचा स्कोअरबोर्ड हलता ठेवला. दोघांनी द्विशतकी भागीदारी करत मुंबईला 300 पार पोहचवलं.
श्रेयस अय्यरची शतकी खेळी
आयुष म्हात्रे त्यानंतर आऊट झाला. आयुषला द्विशतक झळकावण्याची संधी होती. मात्र तो दुर्देवी ठरला. आयुषने 176 धावा केल्या. त्यानंतर श्रेयसने 131 बॉलमध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं. श्रेयसने या खेळी दरम्यान आणखी एक कारनामा केला. श्रेयसने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 6 हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला.
श्रेयस अय्यरची 2024-2025 या देशांतर्गत हंगामाची निराशाजनक सुरुवात झाली. श्रेयसने दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील 6 पैकी 2 डावात अर्धशतक झळकावलं. तर श्रेयसला 2 वेळा भोपळाही फोडता आला नाही. श्रेयसने यासह एकूण 154 धावा केल्या. तसेच श्रेयसने इराणी कप स्पर्धेतील 2 डावात अनुक्रमे 57 आणि 8 धावा केल्या. तसेच श्रेयस या रणजी ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात बडोदा विरुद्ध झिरोवर आऊट झाला.
श्रेयसला सूर गवसला
Shreyas Iyer 100 runs in 131 balls (9×4, 3×6) Mumbai 330/4 #MUMvMAH #RanjiTrophy #Elite Scorecard:https://t.co/l7QWZwMQUU
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 19, 2024
सूर्यकुमार यादव फ्लॉप
दरम्यान कसोटीमध्ये कमबॅकसाठी सूर्यकुमार यादवने फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र सूर्या कसोटीमध्ये दावा ठोकण्यात अपयशी ठरला. सूर्या 14 बॉलमध्ये 1 फोरसह 7 रन्स करुन माघारी परतला.
मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, शम्स मुलाणी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटीयन, मोहित अवस्थी आणि रॉयस्टन डायस.
महाराष्ट्र प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), अर्शीन कुलकर्णी, अंकित बावणे, निखिल नाईक (विकेटकीपर), सचिन धस, अझीम काझी, सत्यजीत बच्छाव, सिद्धेश वीर, राजवर्धन हंगरगेकर, प्रदीप दढे आणि हितेश वाळूंज.