रणजी ट्रॉफीत सलग दुसरं द्विशतक, बॉलिवूड दिग्गज डायरेक्टर-प्रोड्युसरच्या मुलाचा ‘डबल धमाका’
दिग्गज डायरेक्टर-प्रोड्युसरच्या 25 वर्षीय मुलाने रणजी ट्रॉफी स्पर्धेत डबल धमाका केला आहे. या क्रिकेटरने सलग दुसरं द्विशतक ठोकत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दिग्गज प्रोड्युसर-डायरेक्टर असलेल्या विधु विनोद चोप्रा यांचा मुलगा अग्नी चोप्रा याचा रणजी ट्रॉफी स्पर्धेत धमाका कायम आहे. मिझोरमकडून खेळणाऱ्या अग्नी चोप्रा याने रणजी ट्रॉफी प्लेट स्पर्धेत डबल धमाका केला आहे. अग्नीने सलग दुसऱ्या सामन्यात द्विशतकी खेळी केली आहे. अग्रीने मणिपूर विरुद्ध 269 बॉलमध्ये 218 धावांची खेळी केली.अग्नीने सातत्यपूर्ण फलंदाजी करत गेल्या 3 डावात 100+ पेक्षा धावा केल्या आहेत. अग्नीने अरुणाचल प्रदेश विरुद्ध अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात 110 आणि 238 धावांची खेळी केली होती.मिझोरमने त्या सामन्यात 267 धावांनी विजय मिळवला होता. अग्नीने मुंबईकडून अंडर 19 आणि 23 वर्षांखालील संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
अग्नीला जास्तीत जास्त वेळ खेळता यावं यासाठी प्रशिक्षक खुशप्रीत यांनी त्याला दुसऱ्या टीमकडून खेळण्याचा सल्ला दिला. अग्नीने प्रशिक्षकाचा सल्ला मानत मिझोरम संघासह जोडला गेला.अग्नीने मिझोरमकडून क्रिकेट खेळताना ‘फर्स्ट क्लास’ सुरुवात केली. अग्नीने रणजी ट्रॉफीतील पहिल्या 4 सामन्यांमध्ये अनुक्रमे 105, 101, 114, 10, 164, 15, 166 आणि 92 अशा धावा केल्या. अग्नीने त्याच्या कारकीर्दीतील 4 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये शतकी खेळी करण्याचा विक्रम केला आहे, असा कारनामा दिग्गज सर डॉन ब्रॅडमॅन यांनाही करता आला नव्हता.
अग्नीची प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्द
अग्नीने आतापर्यंत 9 फर्स्ट क्लास सामन्यांमधील 17 डावांमध्ये 1 हजार 585 धावा केल्या आहेत. अग्नीने सलग 8 वेळा 100 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
सामन्याची स्थिती
अग्नीने केलेल्या 218 धावांच्या जोरावर मिझोरमने पहिल्या डावात 536 पर्यंत मजल मारली. मणिपूरचा पहिला डाव हा 270 धावांवर आटोपल्याने त्यांना फॉलऑन देण्याचा निर्णय केला आहे. आता मणिपूर यातून कशी बाहेर पडते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
मणिपूर प्लेइंग इलेव्हन : लँगलोनयाम्बा केशांगबम (कर्णधार), कर्नाजित युमनम, अल बाशिद मुहम्मद, कंगाबम प्रियोजित सिंग, जॉन्सन सिंग, फेरोइजाम जोतिन, रेक्स राजकुमार, प्रफुल्लोमणी सिंग (विकेटकीपर), सुलतान करीम, अहसानुल कबीर आणि बिश्वरजित कोनजित.
मिझोराम प्लेइंग इलेव्हन : बॉबी झोथनसांगा (कर्णधार), लालह्रित्रेंगा, मार्टी लालरिन्हुआ, अग्नी चोप्रा, जेहू अँडरसन (विकेटकीपर), जोसेफ लालथनखुमा, केसी करिअप्पा, विकास कुमार, मोसेस रामहलुनमाविया, जी लालबियाकवेला आणि मोहित जांग्रा.